The Camp Fiasco : बिलोलीच्या रामतीर्थ येथील महसूल समाधान शिबिराचा फज्जा

बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| रामतीर्थ मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान अंतर्गत शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदेड विद्यालयात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिबिर सुरू होताच अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आल्याने या शिबिराचा चांगलाच फज्जा उडाला.


शिबिराच्या सुरुवातीलाच विडुल माने यांनी सर्व २६ विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती तपासण्याची मागणी केली. त्यानुसार एकेका अधिकाऱ्यांची हजेरी घेतली असता अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत आणि शिबिराचा उद्देशच फोल ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शासन आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर राहिले. काही कर्मचारी अत्यावश्यक कामामुळे अचानक निघून गेल्याने सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी चालत आलेल्या नागरिकांना मोठी निराशा सहन करावी लागली.


रामतीर्थ मंडळातील रामतीर्थ, हिंगण्या माळ, किनाळा, कामसुरवाडी, चिंचोली, अटकेळी, टाकळी बु., डोंगाव बु., पारडीपिंपरी, रामपूर, केकर, भुजूर, डोंगाव खुर्द या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिक विविध तक्रारी व अर्ज घेऊन शिबिरात आले होते. मात्र अनेक स्टॉल्स रिकामे असल्याने नागरिक एकमेकांकडे चौकशी करत तालुक्यात उभे राहिले. अखेर कोणाचाही प्रश्न मार्गी न लागल्याने नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले.


या शिबिरासाठी किनाळा येथील विठ्ठल माने, बाबाराव पाटील, हनुमंत पाचाळ, डिगळे येथील जाधव, रामतीर्थ येथील काकडे यांच्यासह परिसरातील काही ज्येष्ठ महिला आणि नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. मात्र जागेवर समाधान न झाल्याने त्यांनाही निराश होऊन परतावे लागले.

यावेळी तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल. तसेच जे कर्मचारी शिबिरास गैरहजर राहिले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शिबिराच्या नियोजनात त्रुटी आल्याने येत्या शनिवारी पुन्हा समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले हे शिबिर प्रत्यक्षात केवळ औपचारिकतेपुरते राहिल्याची टीका विठ्ठल माने यांनी केली.



