नवीन नांदेड। नांदेड उस्माननगर रस्त्यावर गुंडेगाव गावाजवळील पेट्रोल पंपाच्या समोर दुचाकी वाहनाला भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने जबर धडक दिल्याने दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी शनिवारी दुपारी ३.३०च्या दरम्यान घडली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या येणाऱ्या वाहन धारकांनी व नागरीकांनी गर्दी केली होती.


पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नांदेड- उस्माननगर रस्त्यावरून शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास दोघे जण दुचाकी वाहनावरून जात होते, गुंडेगाव गावाजवळ पेट्रोल पंपाच्या समोर येताच एम.एच.२६ ऐ. टी. ८८८८ या क्रमांकाच्या टिप्परने दुचाकी क्रमांक एम.एच.१२ एम.डी ७९९५ यास जबर धडक दिली.


यात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून घटना स्थळी मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. अखेर खाजगी वाहनाने मयत व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले,घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शना खाली पोहेकॉ जी.एस.तेलंगे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन अपघातातील मयत व जखमी रूग्णालयात पाठवले व घटनास्थळी असलेली वाहतूक सुरळीत केली.


या अपघातात दुचाकी वरील रूपेश भगवान पवार हा जागीच ठार झाला तर अक्षय पवार हा गंभीर जखमी झाला असून दोघेही सिडको भागातील रहिवासी आहेत, या घटने बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.अपघातातील टिप्पर हा पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.



