
लोहा| एकादशीला पेंडू येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भक्तांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. चितळी ते हिप्परगा व पुढे पेंडू जिल्हा सीमेपर्यंत सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हिप्परगा येथे पार पडला.


या रस्त्यामुळे दर एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे. हिप्परगा गावकऱ्यांनी विकासकामांसाठी सहकार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आमदारांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य ह.भ.प. मारोतराव महाराज हिप्परगेकर होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता शिवाजी राठोड, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पाटील पवार, हिप्परगाचे सरपंच बालाजी पाटील, चितळीचे सरपंच उद्धवराव पाटील सुर्यवंशी, हळदव गावचे युवा नेते बंडू पाटील वडजे, इंजि. अविनाश पाटील सुर्यवंशी, दापशेडचे सरपंच विरभद्र राजुरे, अन्सार खा पठाण, माधव पाटील अन्नकाडे, पेनूरचे माजी सरपंच बाबाराव पाटील गवते, बेरळीचे माजी सरपंच संदीप होळगे, सुरेश ढेंबरे, तुकाराम लोंढे, माधव पाटील जामगे, देऊळगावचे सरपंच मारोतराव सोनवळे, सतीश पाटील बाबर, रंगनाथ पवार, संभाजी कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.


आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, “हिप्परगा ते पेंडू या रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हा सीमेपर्यंत उर्वरित कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देणार आहोत.” देवस्थानांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचा उल्लेख करत त्यांनी डोंगरगाव, उमरज व बोरी येथील विकासकामांचा आढावा घेतला.

हिप्परगा येथे नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, रस्ते व दलित वस्ती विकासासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच त्यांच्या हस्ते हिप्परगा येथील दलित वस्तीत नव्याने बांधलेल्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. काबेगाव व धानोरा (म.) येथेही त्यांनी गावभेट देत नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव पाटील अन्नकाडे यांनी केले, तर अविनाश पाटील सुर्यवंशी यांनी फराळाची व्यवस्था केली.
वारकरी भक्तांना मोठा दिलासा
प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर, पेंडू येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना नव्या सिमेंट रस्त्यामुळे मोठी सोय होणार आहे. जिल्हा सीमेपर्यंतचा उर्वरित रस्ताही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. एकादशीच्या दिवशी पेंडूकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी हा रस्ता विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

