मुंबई| महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने (Narendra Chapalgaonkar Dies) सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच न्यायमूर्ती चपळगावकर यांना वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. प्राध्यापक, वकिल, न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती.


स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स्वामींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. कथा, कवितांचे लेखन करतानाच वैचारिक लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी शब्दांच्या निवडीवर त्यांचा विशेष भर असे. त्यांची ग्रंथसंपदा हे मागे राहिलेले विचारधन आहे. न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
“ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतिशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते.


वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिले. त्यांनी लिहिलेले ‘गांधी आणि संविधान’ पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचे अलौकिक दर्शन घडवणारे आहे.
वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्व दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेले भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
कृतिशील विचारवंत हरपले – मंत्री ॲड. आशिष शेलार
ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरजी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारे कृतिशील विचारवंत आज आपल्यातून हरपले आहे. मराठी साहित्य, भाषा, आणि संस्कृतीसाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. अशिष शेलार यांनी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
व्यक्तिचित्रण आणि ललित लेखनातून त्यांनी साहित्यप्रेमींना प्रेरित केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मराठी साहित्याला वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्या जाण्याने न्याय, समाज, आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव आपल्याला नेहमीच भासत राहील, असे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.