Maruti Raya temple in Borgadi : हनुमान जन्मोत्सवा निमित्त बोरगडी येथील मारुतीरायाच्या मंदिरात उसळणार भक्तांची मांदियाळी

हिमायतनगर, अनिल मादसवार| सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी (देवाची) येथील मारुतीरायाच्या मंदिरात श्रीराम जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दि.०६ एप्रिल रविवार पासून होणार आहे. तर मारोतीरायाचा जन्मोत्सव सोहळा दि.१२ एप्रिल शनिवारी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५ ते ६.३० या वेळेत होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत हभप योगेश महाराज अग्रवाल वसमत यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. सप्ताहाचा समारोप दि.१३ एप्रिल रविवारी कुस्त्यांची दंगल व महाप्रसादाने होणार आहे. उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक – भक्तांनी उपस्थित राहून हनुमंतरायाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमेटी आणि गावकऱ्यानी नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील मनोकामना पूर्ण करणाऱ्या मारोतीरायाचे मंदिर विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी बोरगडी येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हजारो भाविक भक्त उपस्थित होऊन आपली मनोकामना पूर्ण करतात. ज्यांची इच्छा पूर्ण झाली ते भाविक पुरण – पोळीचे नैवैद्य हनुमंतरायला चढवितात. आणि इष्टमित्र नातेवाईकांना भोजनाचं आमंत्रण देतात. हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगडी येथील मारोतीरायाच्या मंदिरात अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा कार्यक्रम हभप. माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

या सप्ताह सोहळ्याची सुरुवात रामनवमी रोजी म्हणजेच रामजन्मोत्सव दि.०६ एप्रिल पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने होणार आहे. दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर यांच्या मधुर वाणीत संपन्न होणार आहे. हरिपाठ व गाथा भजन व्यासपीठ हभप.साहेबराव महाराज सांभाळणार असून, दररोज रात्री ८ ते १० या वेळेत हभप. पांडुरंग महाराज येळेगावकर, हभप. भगवतीताई महाराज सातारकर, हभप. चिन्मय महाराज सातारकर, हभप.निळोबा महाराज हरबळकर, हभप. सुनील महाराज लाजूळकर, हभप. सुनील महाराज लांजुळकर, हभप.गणेश महाराज राठोड, हभप.वासुदेव महाराज कोलंबिकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. तर हनुमान जनोत्सव दिनी दि.१२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा असल्याने पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५.३० वाजता अभिषेक महापूजा खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तत्पूर्वी सकाळी हभप. योगेश महाराज अग्रवाल यांचे कीर्तन होणार आहे.


शेवटच्या दिवशी समारोपाला हभप.नारायण महाराज आर्वीकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे. त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. तसेच दुपारी १२ ते ०२ वाजेच्या दरम्यान कठाळ्याची हर्राशी त्यानंतर दुपारी १ वाजता कुस्त्यांची दंगल सुरु होणार आहे. याचे उद्घाटन व बक्षीस वितरण श्रीरंग काईतवाड, चक्रधर काईतवाड, निकेश राठोड यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कुस्तीच्या फडात जिंकणाऱ्या मल्लास ४००१ रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, दुसर्या क्रमांकास ३००१ रुपये व तिसर्या क्रमांकाच्या मल्लास २१०० तर चौथ्या क्रमांकाच्या मल्लास २००० रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त अन्य १००१, ७०१ रुपयाच्या कुस्त्या खेळल्या जाणार आहेत. रामनवमी व हनुमान जन्मोत्सव सोहळा श्री, मारोती मंदिर कमेटी व श्री चैतन्य सांप्रदाय प्रसार संस्था उपशाखा बोरगडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, या धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मारुती मंदिर ट्रस्ट कमेटी व समस्त बोरगडी येथील गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.




