Police recruitment : पैशांची मागणी करताच कारवाई; पोलिस भरती प्रक्रियेला डाग – संबंधित कर्मचारी निलंबित
लेखी परीक्षेत मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी; वरिष्ठांकडून तात्काळ कठोर निर्णय

नांदेड, प्रतिनिधी| पारदर्शक व शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेला धक्का देणारी घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. भरतीच्या लेखी परीक्षेत मदत करून देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका पोलिस कर्मचाऱ्यावर झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्यभर सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यातील काही उमेदवारांकडून मोबाईलद्वारे संपर्क साधत पैशांची मागणी केल्याची तक्रार वरिष्ठांकडे पोहोचली. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस अमलदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भरती प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी प्रशासनाने अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


पोलिस विभागाकडून या घटनेची सखोल विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर आणखी कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा दलालांच्या आमिषाला बळी न पडता केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.




