हिमायतनगर | भगवंतावर श्रद्धा असेल तर मोठं काही देण्याची गरज नाही साधेपणातच शिवशक्तीचं सामर्थ्य आहे, तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र अर्पण केल्यानेही महादेव प्रसन्न होतो असा संदेश बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिला.
नामजप यज्ञाचा सातवा दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळ पासूनच मंदिर परिसरात भाविकांची रीघ लागलेली होती. मंत्रोच्चार, धूप, दीप आणि घंटानादाच्या गजरात “ॐ नमः शिवाय” चा अखंड जप अखिल वातावरणात गुंजत होता. रात्री 8 वाजता बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी ओम नमः शिवाय नामजप यज्ञात भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत भागवताचार्य सारंग चैतन्य जी महाराज उपस्थित होते. सातव्या आणि आठव्या दिवशी उमरखेड तालुक्यातील बोरी येथील भजनी मंडळांनी रात्रीच्या अखंड नाम जाप मध्ये सहभाग घेतला. भजनी मंडळाच्या गोड आवाजात टाळमृदंगाची साथ त्यामुळे मंदिर परिसर ओम नमः शिवाय नामाच्या जयजयकार सुरू होता.

बाल-तरुण-प्रौढ सर्व वयोगटातील भाविक एकत्र येऊन नामजपात सहभागी झाले, स्थानिक महिला मंडळाने सामूहिक रुद्राभिषेक व भजन सेवा, नामस्मरणानंतर साधू-संतांचे मार्गदर्शनाचा लाभ घेतला. “शिवनाम हेच जीवनात शुद्धीचं साधन आहे” असे मार्गदर्शन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केल. “शिवनामाचा गजर वाढू द्या, शंकराच्या चरणी बेलपत्र अर्पण करून महादेवाचे दर्शन घ्या असेही त्यांनी सांगितले.
“प्रत्येकानी नामस्मरण करावं” – हे बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांचे साक्षात आह्वान आहे. त्यांच्या मते, नामस्मरण हेच खऱ्या भक्तीचं मूलमंत्र आहे. कोणतंही वय, कोणतंही संकट, कोणतीही परिस्थिती असो शिवनामाचा जप प्रत्येकालाच अंतःकरणापासून शुद्ध करतो, मन स्थिर करतो आणि भगवंताशी एकरूप करतो.
“मनात श्रद्धा असेल आणि ओठावर ‘ॐ नमः शिवाय’ असेल, तर परमेश्वर दूर राहत नाही. असा दिव्या संदेश त्यांनी दिला. त्यानंतर ‘ॐ नमः शिवाय’ नामाचा जाप अखंडितपणे चालू झाला. यावेळी शहराचा ग्रामीण भागातील महिला मंडळी व भाविकांनी नाम यज्ञात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. श्रावण समाप्तीपर्यंत नामजप चालणार असून, यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.




