नांदेड| इन्स्टाग्रामवर पोस्ट का टाकला असे म्हणत पत्रकार शेख याहीया यांच्या मुलाचे अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आल्याची घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील फारूखनगर येथिल फैज-उलुम हायस्कुमध्ये शिकणारा शेख इम्रान शेख याहिया याने इन्स्टाग्रामवर शहरातील पिर बुर्हान येथिल युसूफिया हायस्कूलमधील दहावीत शिकणार्या एका विद्यार्थ्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केली होती. या पोस्टचा राग मनात धरून युसूफिया हायस्कूलमधील मुलाने आपल्या तीन साथीदारांसह फारूखनगर येथून शेख इम्रान याचे अपहरण केले.

नवी आबादी, लेबर कॉलनी या ठिकाणी नेऊन त्यास थापड बुक्याने मारहाण करण्यात आली. याच दरम्यान शेख इम्रान यांने प्रसंगावधान दाखवत भावाच्या मोबाईलवर इंस्टाग्राम आयडी असल्याचे सांगत त्यांच्याकडून मोबाईल घेतला व आपल्या भावाला संपर्क केला. भावाला संपर्क केल्यानंतर त्याचा भाऊ शेख अजहर व त्याचे वडील शेख याहिया यांनी शहरात विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला.

शेवटी स्नेहनगर येथील पोलीस पेट्रोल पंपाजवळ त्यांना तीन अल्पवयीन मुलांच्या तावडीत त्यांचा मुलगा शेख इम्रान आढळून आला. याप्रकरणी शेख अजहर शेख याहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख इम्रानचे अपहरण करून मारहाण करणारे तिन्ही अल्पवयीन मुले युसूफिया शाळेत इयत्ता दहावीत शिकणारे विद्यार्थी आहेत तर त्यापैकी एकाच्या इंस्टाग्राम प्रोफाइल आयीडीवर ३०२ असे लिहिण्यात आलेले आहे.

दरम्यान शहरात अल्पवयीन मुलांकडून हाणामारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकतेच शहरातील आनंदनगर चौकातील राज मॉल येथे अल्पवयीन मुलांनी एकाचा खून केला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अपहरणाचा प्रयत्न करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.