नांदेड| भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही तत्वांचा स्विकार केला. त्यांची लोकशाही शासन व्यवस्थेची संकल्पना उदात्त होती. लोकशाही म्हणजे निव्वळ राजसत्ता नव्हे तर ती एक जीवनप्रणाली आहे. सर्व सामान्य माणसाला हक्क आणि अधिकार ही व्यवस्था देते म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला, असे प्रतिपादन येथील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी केले.


ते भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे तर प्रमुख अतिथी म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, बीपीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती. येथील भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथील बँक्वेट हाॅल मध्ये माता रमाई आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय संविधान आणि संसदीय लोकशाही या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

माता रमाई आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प फारुख अहमद यांनी गुंफले. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सामान्य माणसाला सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून आयुष्यभर संघर्ष केला. राष्ट्राची उभारणी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांवर उभी करण्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अथक प्रयत्न केले. परंतु आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही ही मूल्ये भारतीय समाजात रुजली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मान्यवरांच्या सत्कारानंतर कवी नागोराव डोंगरे यांनी आपल्या कवितेतून माता रमाईस अभिवादन केले. बालाजी थोटवे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीमंत राऊत यांनी केले. संगिता राऊत यांनी स्वागतगीत गायले. सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी तर आभार सतिशचंद्र शिंदे यांनी मानले. दुसऱ्या सत्रात बीपीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार यांचा साठावा वाढदिवस संघटनेच्या व कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी मिथून मंडलेवार, नेहा माचनवार, डी. आर. विभुते, बालाजी इबितदार, एच. पी. कांबळे, गोविंदराम शूरनर, बालाजी शिंदे आणि राजश्री माचनवार यांनी अभिष्टचिंतन व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी तिन्ही संघटनेचे पदाधिकारी आणि विचारवंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकारणाचे जागृतीकरण आवश्यक
दरम्यान, फारुख अहमद म्हणाले की, राजकीय क्षेत्रात जागृतीकरण आवश्यक आहे. निवडणूक लढविणारा आणि मतदान करणारा हे दोन्ही घटक अज्ञानी असता कामा नयेत. अन्यथा लोकशाहीची सूत्रे चुकीच्या माणसांच्या हाती जातात. पैसा, जात आणि धर्म यांवर निवडणूका लढविल्या जातात. यांवर आधारित होणारे राजकारणही संसदीय लोकशाहीला बाधा पोहचविते. भविष्यात राजकारणाच्या जागृतीकरणाची आवश्यकता भासणार आहे. भारतीय राजकारणात विरोधी पक्ष नसणे हे लोकशाही संपविण्याचेच लक्षण आहे. संसदीय लोकशाहीला मागे टाकून हुकुमशाही निर्माण करणे म्हणजे लोकांना पुन्हा गुलामीकडे नेण्याची प्रकिया सुरू झाली आहे असेही ते म्हणाले.