
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर जवळगावकर यांनी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या मंदिर कमिटीच्या आजवरच्या कामकाजाच्या छायाचित्र संग्रहाची पाहणी केली.

मंदिर कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांतून केलेल्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. “मंदिर कमिटीच्या पुढाकारामुळे हिमायतनगरच्या वैभवात भर पडली आहे. मंदिराच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास मी सदैव पाठीशी राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत संचालक मंडळाला सहकार्याचे आश्वासन दिले.



या प्रसंगी मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सभापती जनार्धन ताडेवाड, प्रवीण कोमावार, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, यात्रा सब-कमेटी अध्यक्ष सुभाष शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.


महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील व्यवस्था, प्रशासनिक कामकाजाची सुलभता आणि भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे मंदिराच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. मंदिर विकासाच्या नव्या टप्प्याची सुरुवात म्हणून या कार्यालय उद्घाटनाकडे पाहिले जात आहे.

