Mla. Shrijaya Chavan : नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आ. श्रीजया चव्हाण यांचा विधानसभेत पाठपुरावा

नांदेड | भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी राज्य विधानसभेत अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. जिल्ह्याच्या विकासासह नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मांडले.


नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची तसेच शहरात सेफ सिटी प्रोजेक्ट मंजूर करण्याची मागणी आ. चव्हाण यांनी केली. याशिवाय भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या शहरांचाही सेफ सिटी योजनेत समावेश करून तेथे अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील १०२ शेतकऱ्यांच्या विहिरींचे मोठे नुकसान झाले. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे शेतकरी विशेष मदत पॅकेजपासून वंचित राहिल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आणि या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.


याशिवाय पीक विमा मंजुरीसाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उपकरणांमध्ये आढळलेल्या त्रुटींची सखोल चौकशी करून त्या दूर करण्याची आवश्यकता त्यांनी नमूद केली. पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याचीही मागणी त्यांनी केली.

तसेच पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर सुधा प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचा आग्रहही आ. चव्हाण यांनी सरकारकडे धरला.
आरोग्य सुविधांबाबतही मांडल्या मागण्या
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आ. श्रीजया चव्हाण यांनी भोकर येथील श्रेणीवर्धित १०० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच नांदेड येथे प्रस्तावित ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविण्याचीही त्यांनी मागणी केली.



