मी पंढरपूरला जाण्यासाठी हदगाव येथून देगलूर गाडीने बसलो, नांदेड येथे एसटी स्टँडवर उतरलो. पाहतो तर मी ज्या सीटवर बसलो होतो त्याच सीटवर माझा मोबाईल विसरला आणि ती सदर गाडी देगलूरकडे रवाना झाली होती. माझा एकवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल गेल्याचे मला कळले. मी हतबल झालो काय करावे सूचना झाले. मग माझ्या स्वतःच्या मोबाईल वर फोन केला (Met Vitthal in the form of Namdev) असता तो फोन मला वारंवार व्यस्त येत असल्याचे कळवण्यात आले.

आता म्हणलो मोबाईल गेलाच. पण काय चमत्कार मी ज्या सोबत्याच्या मोबाईल वरून फोन केला होता त्यावेळी तो व्यस्त असलेला मोबाईल पुन्हा वाजला. आणि तिकडून आवाज आला की, हा मोबाईल तुमचा आहे का? मला तर काहीच कळेना? स्वप्नागतगत झाली होती माझी. मी म्हटलं हो साहेब माझाच आहे हो,
आणि मी पंढरपूरला चाललोय तेवढ्यात त्या व्यक्तीने मला तुम्ही नरसी बसस्थानकामध्ये या असा आवाज दिला .आणि मी लगेच दुसऱ्या गाडीने नरसी नायगाव या बसस्थानकामध्ये गेलो असता सदर भोळा भाबडा शेतकऱ्याचा पोरगा नाव नामदेव सांगत होता.

मी त्यांना भेटताच त्यांचा चरणस्पर्श करू लागलो तेव्हा त्यांनीच मला माऊली म्हणून मिठी मारली. मी एक हजार रुपयाचे बक्षीस सदर नामदेवराव यास देऊ लागलो असता त्यांनी अजिबात एकही रुपया घेणार नाही उलट त्यांनीच मला पांडुरंगाच्या दानपेटी मध्ये टाकण्यासाठी पन्नास रुपये दिले. मी पुष्कळ विनंती केली की माझ्याकडून हे तुम्ही बक्षीस म्हणून राहू द्या परंतु त्या विठ्ठलाने, नामदेवाने माझी भेट नाकारली परंतु माझा हरवलेला मोबाईल परत देण्यासाठी, त्याच्या गावाकडे जाणारी गाडी सोडून माझी एक तास नरसीच्या बसस्थानकामध्ये वाट पाहत राहिलेला हा साक्षात विठ्ठलाचा अवतार, मला आज भेटला.


नाहीतर आजच्या या युगामध्ये कोण कोणाला मोबाईल परत देतोय. परंतु या इमानदार व्यक्तीच्या रूपाने खरंच मला विठ्ठलाच्या दर्शनाचा प्रतय आला. म्हणून मला मनापासून वाटते, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…. …….पांडुरंग कदम, हदगाव, जी.नांदेड.


