Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ३ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

“रेल्वेतील रस्ता… हृदयातील हरिदर्शनाचा प्रवास!” (From Amarnath Cave – Part 3 (Author – Dharmabhushan Adv. Dilip Thakur) आजचा पूर्ण दिवस रेल्वेचा. त्यामुळे “आज जरा निवांत!” असं ठरवलं होतं. पण ‘भोलेनाथाची चाहूल’ मनात इतकी खोलवर रुजली आहे की, नेहमीप्रमाणेच पहाटे पाचपूर्वी जाग आली.प्रातःस्मरण आणि प्राणायाम झाला… तरीही वेळ काही जाईना.बर्थ B11 – हमसफर एक्सप्रेसचा शेवटून तिसरा डबा. पण यात्रेकरूंना पाहण्याची ओढ मनातच रेंगाळत होती.

रेल्वेतलाच मॉर्निंग वॉक, एक भक्तिपरिक्रमा! “वेटिंग लिस्ट” चे प्रवासी, आरएसीची गादी, आणि माझी पदयात्रा! प्रत्येक बोगीतून चालत चालत शेवटी पेंट्री कारपर्यंत पोहोचलो.तिथे मात्र गजबजाट होता – पोहे, पराठे, पुरी भाजी, कटलेट…रेल्वेच्या त्या स्वयंपाकघरात नुसती पाककृती नव्हती, तर प्रवाशांच्या दिवसाची ऊब तयार होत होती.मॅनेजरला माझं भाजप चे कार्ड दाखवलं आणि स्पष्ट बजावलं –

“सर्वांना एकसमान व दर्जेदार नाश्ता पाहिजे!” तो तयार झाला – आणि मी सर्वांसाठी पोहे आणि मसाला चहा ऑर्डर दिली.सर्व यात्रेकरूंना सकाळी ८ वाजता नाश्ता मिळेल, असं सांगून मी परतीची ‘रेल्वे परिक्रमा’ सुरू केली.माझ्या बर्थवर आलो तेव्हा साडेसात झाले होते. वाट पाहणारा वेळ आता उत्सुकतेत बदलला होता.या वर्षीच्या यात्रेतसुद्धा अनेक अन्नदाते जोडले गेले.यातलेच मुखेडचे अमरनाथ बालाजी इंगोले सर त्यांनी फोन करून सांगितलं, “आजचा नाश्ता आणि चहा माझ्या तर्फे द्या ” राजूभाऊ – माझा छोटा भाऊ यावेळी माझ्या मदतीसाठी टूर मॅनेजर म्हणून आला होता त्याने पेंट्री स्टाफशी समन्वय साधून सर्वांना नियोजित नाश्ता व्यवस्थित दिला.

ग्रुपमध्ये मी एक मेसेज टाकला:”सर्वांनी गळ्यात आयकार्ड घालावे – जेणेकरून सेवा अचूक पोहोचेल.”
पोहे, मसाला चहा – दोन्हींची चव अशी की, “माऊलीच्या हातची आठवण” आली. सर्वांनी समाधानाने खाल्लं. थोडया वेळाने गेल्या वर्षी आमच्या सोबत आलेल्या रेखाताई भताने यांचा मोबाईल वर मेसेज आला. “ दुपारचे जेवण माझ्या तर्फे द्या म्हणून ” मी त्यांना फोन करून सांगितले की, ताई दिल्ली अशोकराव चव्हाण साहेब हे जेवण पाठविणार असल्यामुळे आपल्या तर्फे श्रीनगर ला डिनर देतो. त्यांनी संमती दर्शविली.

का आम्हीच? यात्रेकरूंचं मनोगत!
ग्रुपमधील बाहेरगावचे प्रवासी माझ्याशी बोलताना विचारत होते –”तुमच्याच सोबत आम्ही यात्रा का करतो आहोत याचं उत्तर आधीच मिळालंय…” ते सांगत होते –”आमच्या नातेवाईकांनी, मित्रांनी तुमच्याबद्दल जे अनुभव सांगितले, त्यातूनच विश्वास तयार झाला.” माझं उत्तर साधं होतं –”यात्रा पूर्ण झाल्यावर ठरवा – विश्वास ठेवलात त्याचा मान राखतो की नाही!”

दिल्लीचा दुपारचा ‘पक्वान प्रसाद’
अशोकराव चव्हाण – महाराष्टाचे नेते .त्यांना अमरभाऊ राजूरकर यांनी सांगितले की, दिलीप ठाकूर हे 93 यात्रेकरू समवेत 25 व्या अमरनाथ यात्रेला दिल्ली वरून जात आहेत. चव्हाण साहेबांनी दिल्ली स्टेशनवर आमच्यासाठी भोजनाची जबाबदारी त्यांचे पी ए सुरेश भोसीकर यांच्यावर सोपविली. तसेच प्रवासात अडचण येऊ नये यासाठी दोन शिफारस पत्रे ही दिली. त्यांनी दिलेलं जेवण – गरम, रुचकर, आणि भरभरून – सर्वांना लाभलं.खाऊन झाल्यावर सक्तीची वामकुशी! – शरीर विश्रांती घेत असतानाच मन मात्र शिवस्मरणात गुंतलेलं.

गाण्यांची मैफिल, सुरांच्या रथातून भोलेनाथाला वंदन
संध्याकाळी साडेचार वाजता ‘मैफिल’ सुरू झाली. कोणी सुरेल, कोणी काव्यात्म, कोणी संकोचून – पण प्रत्येकाने ‘गायन’ म्हणजे ‘अर्पण’ केलं. मीही स्वतःचं गाणं गायलं – “ओ मेरी जोहराजबी…” “तेरे चेहरे में वो जादू है…” हे केवळ सूर नव्हते – प्रवासाच्या थकव्यावर हळुवार फुंकर होती.

लुधियानामध्ये ‘सरदार भाव’ आणि ‘लंगरचा स्वाद’
सायंकाळी सहाच्या सुमारास लुधियाना स्टेशन आलं. तिथं आधीपासूनच कुलदीपसिंघ दीपा आणि हुजूर साहेबच्या जथ्याचे २०-२५ सरदार मोठ्या जल्लोषात आमच्या स्वागतासाठी आले होते. “जो बोले सो निहाल… सत श्री अकाल… बम बम भोले!”ह्या घोषात स्टेशन दणाणलं. त्यांनी आमच्या सर्व यात्रेकरूंना लंगरचा प्रसाद दिला – छोले भटूरे, पुदिन्याची चटणी, गरम खीर… स्मृतिचिन्ह, सिरोपाव, आणि गुरुद्वाऱ्याचा प्रसाद देऊन त्यांचा सन्मान केला.त्यांचं प्रेम पाहून डोळे पाणावले. ट्रेन सुरू झाली तरी हृदय तिथंच अडकलं. यात्रेकरूं पाठोपाठ, आम्ही “लो भाई, अमरनाथ लंगर प्रसाद है!” म्हणत इतर प्रवाशांना दिला. ट्रेनमधील अटेंडंट्स, स्वच्छता कर्मचारी – सगळ्यांनाही आवर्जून जेवण दिलं. हा केवळ अन्न नव्हता – ती होती सेवेची साधना! रात्री ११.३० ला आम्ही जम्मूला पोहोचणार – त्यामुळे सर्वांना सांगितलं – “आता झोपायला हवं… कारण उद्याचा दिवस पर्वतपथाचा आहे!” थोड्याच वेळात सारा डब्बा शांत झाला. पंख्याच्या गारव्यामध्ये आणि भोलेनाथाच्या स्मरणात मीही डोळे मिटले… (क्रमश:)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button