किनवट, परमेश्वर पेशवे। सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात शनिवारी (दि.१५ जून) व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक ०१/०७/२०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करावे, असे राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) नंदकुमार बेडसे यांनी पत्राद्वारे कळविले असल्याचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी सांगितले.
त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी : शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधी मध्ये करण्यात यावा. निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. नजीकच्या परिसरातील दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने बाजारपेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे. शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी शिक्षण विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे/शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन/प्रबोधन करावे. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्ती साठी उपाय योजना, सेतू अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे. शाळा प्रवेशोत्सावाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात यावे. शाळा सुरु होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत, मोफत पुस्तक वितरण, मोफत गणवेश इत्यादी कार्यक्रम आयोजित करावेत.
यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे. दिनांक १५ जून, २०२४ रोजी राज्यात शाळा प्रारंभ होत आहेत. हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करावा. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधून या दिवशी मिष्ठान्न भोजन द्यावे.