“शिवाच्या साक्षात सान्निध्यात, बर्फानी बाबाच्या चरणी!”
रात्री १ वाजता, कुडकुडत्या थंडीच्या साक्षीने, आमचे सर्व यात्रेकरू गरम पाण्याने स्नान करून तयार झाले. पूर्वी अमरनाथ गुहेजवळ मुक्काम करण्याची सोय होती.परंतु चार वर्षांपूर्वी आलेल्या प्रलयंकारी पुरामध्ये तंबू वाहून गेल्याने, आता कुणालाही गुहेजवळ थांबण्याची परवानगी नाही.म्हणूनच आम्ही सर्वांनी एकाच दिवसात दर्शन घेऊन परतीचा निर्णय घेतला – आणि सर्वांसाठी डोली किंवा घोडा अनिवार्य केला. डोली – 21 यात्रेकरू,घोडे – 72 जण, 70 वर्षावरील 1 जण असल्यामुळे बरेच प्रयत्न करून देखील त्यांना दर्शनासाठी सोडले नाही.बुकिंग करतानाच तशी कल्पना दिलेली असल्यामुळे त्यांची मनाची तय्यारी झाली होती.(From Amarnath Cave – Part 7 (Author – Dharmabhushan Adv. Dilip Thakur)

पहाटे तीन वाजता… सुरू झाली ‘बम बम भोले’ ची गजर
साडेचार वाजता गेट उघडले, आणि हजारो भाविकांनी एकाच वेळी हर हर महादेवचा जयघोष करत प्रवेश घेतला.गेटवर आरएफआयडी तपासणी व परचीची पडताळणी करण्यात आली. डोली-घोड्यांवर बसलेले सर्वजण क्षणभर खाली उतरून लाईनमध्ये उभे राहिले. घोडेवाले गर्दीत मिळवणं कठीण होतं,पण आमचे अमरनाथ यात्री संघाचे टोपी आणि टी-शर्ट घातलेले पाहून, तेच आम्हाला शोधून घेऊन आले. प्रकृतीच्या थरारात, अमरगंगेच्या काठावरून चढाई करतांना खुप उल्हास वाटत होता. घोड्यावरून चढाई करताना, एका बाजूला उंच पर्वत, दुसऱ्या बाजूला खोल दरीतून अमरगंगा नदीचा वेगाने वाहणारा प्रवाह हा देखावा कित्येकांच्या मनात क्षणभर भयही निर्माण करतो.रेल पथरी बरारी मार्ग, संगम या स्थानकांवर थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे सरकत राहिलो. यंदा दरीच्या बाजूने संपूर्ण बॅरिकेटिंग झाल्याने सुरक्षेची भावना निर्माण झाली होती.

शिवशंभूचं साक्षात दर्शन,निखळ भक्तीचा क्षण
सकाळी नऊ वाजता आम्ही गुफेपासून अडीच किमी अंतरावरच्या ‘घोडा स्टॅंड’ वर पोहोचलो. तेथून पुढील अंतर पायीच पार करावे लागते.काहीजण थकले होते, त्यामुळे त्यांनी प्रत्येकी ₹2100 देऊन डोली घेतली. गुफेच्या पायऱ्या म्हणजे उंचावलेली छातीच जणू! सुरक्षा कडेकोट असल्यामुळे मोबाईल, पर्सेस इ. वस्तू जमा करून, कडक तपासणी नंतरच प्रवेश मिळतो.


गुफेत प्रवेश मिळाल्यावर जो दिव्य अनुभव आला, तो शब्दांच्या पलीकडचा होता. बर्फ पासून तय्यार झालेल्या शिवलिंगाचे दर्शन झाले,गर्भगृहात मी श्री शिवाय नमस्तुभम चा जप केला, शिवलीला अमृत पठणाच्या ४२ ओव्या म्हणालो, आणि १०८ स्फटिकाच्या माळेसोबत एकमुखी व गणेशमुखी रुद्राक्ष शिवलिंगासमोर टेकवले. गुहेमध्ये कबुतरांची जोडी पाहिली. ती जणू बाबांच्या कृपादृष्टीची साक्ष देणारी होती! ज्यांचे दर्शन झाले त्यांनी लगेच परतावे… गुफेच्या पायथ्याशी असलेल्या माहिती केंद्रातून जाऊन घोषणा केली , “मी बालटालकडे परत जात आहे. ज्यांचे दर्शन झाले त्यांनी इतरांची वाट न पाहता लंगर घेऊन परत जावे.”अडीच किलोमीटर चालत परत ‘घोडा स्टॅंड’ ला पोहोचलो. दुपारी १ वाजता पुन्हा घोड्यावरून उतरती वाट पकडली. पाठीमागे वळून गुफेकडे पाहून,”बाबा पुन्हा बोलाव तू…”अशी प्रार्थना मनात ठेऊन उतरायला सुरुवात केली.

पथावर “स्वागत बॅनर”,:एक राजकीय हळवा स्पर्श
माझ्याकडे चार बॅनर होते “भारतीय जनता पक्षातर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत” त्यावर मोदीजी, खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. गोपछडे,संजय कोडगे, महानगर अध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकाराव हंबर्डे व ऍड. किशोर देशमुख आणि माझे फोटो होते. घोडेवाल्याच्या मदतीने योग्य स्थळी ते बॅनर लावले.बर्डी टॉप येथे लंगरचा चहा, आणि संध्याकाळी ४ वाजता आम्ही पुन्हा बालटाल बेस कॅम्पला पोहोचलो.
थकवा झटकणारा मालीश,आणि समाधानाची भावना
सर्वांची हजेरी घेतली, डोलीने गेलेले सर्वजण दोन वाजताच पोहोचले होते.जो पर्यंत सर्व जण खाली येत नाहीत,तो पर्यंत माझी जीवाची घालमेल सुरु असते. मागे पुढे असे सहा वाजेपर्यंत सर्वजण खाली उतरले आणि माझा जीव भांड्यात पडला. भोले बाबाचे परत एकदा आभार मानले. मसाजवाला बोलावून सर्वांनी मस्त मालिश करून घेतली, आणि गरम पाण्याच्या अंघोळीने शरीर-मन दोन्ही टवटवित झाले. यंदाच्या यात्रेची खास गोष्ट, एकाही यात्रेकरूला कुठलीही शारीरिक तक्रार झाली नाही.
निसर्गाने साथ दिली आम्ही काल बसने आलो तेव्हा प्रचंड धूळ होती.रात्री पहिलापाऊस पडल्यामुळे धूळ नाहीसी झाली. आम्ही जेव्हा दर्शनाला निघालो तेव्हा आकाश निरभ्र होते, गारवा होता, वातावरण प्रसन्न होते.आणि चमत्कार म्हणा अथवा योगायोग आमचा शेवटचा यात्रेकरू बालताल टेन्ट मध्ये आला की, मुसळधार पाऊस सुरु झाला. यात्रेचं सर्वोत्तम यश म्हणजे शून्य वैद्यकीय अडचण आली होती. संध्याकाळी लंगरातील विविध स्वाद घेतला. लंगरच्या स्वादिष्ट जेवणानंतर टेन्टमध्ये पलंगावर थकलेल्या शरीरांनी अंग टेकवले आणि समाधानी, गाढ झोप लागली. (क्रमश 🙂

