नांदेड| परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बॅटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन, दिनांक १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1’ चे आयोजन करण्यात आले होते.


सदर मोहिमेत, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक हे सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके ही देखील कारवाईत सहभागी झाली असुन, संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसाय विरोधी कारवायांवर वैयक्तिक देखरेख ठेवली होती.



सदर मोहिमेदरम्यान माहे मे- 2025 मध्ये नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यावसायिकांविरुध्द (1561) गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दि.01.05.2025 ते दि.31.05.2025 पावेतो नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्हयांत अवैध व्यवसायांविरोधात गुटखा, दारुबंदी , मटका/ जुगार, गांजा, अवैध दारु , वाळू व इतर संबधाने खालील प्रमाणे कारवाया करण्यात आल्या आहेत.


| घटक | गुटखा केसेस | जप्त मुद्येमाल | दारुबंदी केसेस | जप्त मुद्येमाल | मटका- जुगार केसेस | जप्त मुद्येमाल | इतर केसेस | जप्त मुद्येमाल | एकूण केसेस | जप्त मुद्येमाल |
| नांदेड | — | — | 227 | 19,70,590 | 102 | 8,96,035 | 42 | 2,79,21,365 | 371 | 3,078,7,990 |
| परभणी | 1 | 37,720 | 249 | 8,43,855 | 96 | 5,77,667 | 31 | 2,02,52,072 | 376 | 2,16,73,594 |
| हिंगोली | 10 | 12,720 | 236 | 10,27,358 | 92 | 1,89,462 | 72 | 61,17,100 | 403 | 7,33,3,920 |
| लातूर | — | — | 319 | 21,24,950 | 54 | 5,89,890 | 27 | 1,53,86,261 | 400 | 1,81,01101 |
| एकूण | 11 | 50,440 | 1031 | 59,66,753 | 344 | 22,53,054 | 175 | 6,96,76,798 | 1561 | 7,78,96,605 |
जून महिन्यात अवैध व्यवसायाविरोधी अभियान-2 राबविणार : गत मे महिन्यात अवैध व्यवसायांचे विरोधात करण्यात आलेली कारवाई जून महिन्यात आणखी व्यापक करण्यात येत आहे. परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी जून महिन्यात ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान-2’ राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेदरम्यान अचानकपणे राबविण्यात येणाऱ्या किमान (4) मासरेडचा समावेश असुन, गुटखा बंदीसाठी व्यापक वाहन व साठवणूक ठिकाणांच्या तपासणीची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान अवैध व्यवसाय चालविणाऱ्या इसमांविरुध्द हद्यपार , MPDA व मोक्का कायदयाखाली कारवाई करण्यासाठी अभिलेखांची पडताळणी करण्यात येत आहे.

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.


