नांदेड | “बूट पाॅलिश करणारा चांभार !” या विषयावर चित्रकला स्पर्धा घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाचा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन शासनास सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे एक निवेदन सादर केले.
कला संचलनालयाच्या जातीयवादी अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाच्या वतीने ९ ते १२ वर्ष वयोगटासाठी दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा परिक्षा घेण्यात आली, त्यात “बूट पाॅलिश करणारा चांभार” हा विषय देण्यात आला होता. बालवयात विद्यार्थांमध्ये जातीयवाद रुजविण्याचा हा जातीयवादी डाव खेळण्यात आला असून दोषी अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
“डाॅक्टर महिला हत्त्येचाही निषेध”
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील उच्चविद्याविभूषित डाॅक्टर महिलेवर पाशवी बलात्कार करुन नंतर त्यांचा क्रूर खून करण्यात आला, याचाही तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला असून सर्व नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनावर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, जिल्हा संघटक संतोष सुर्यवंशी, समाजभूषण शिवानंद जोगदंड, महिला नेत्या सौ. कुसुमताई गायकवाड, सौ. मंगलाताई दुधंबे, युवा आघाडीचे राहुल गोरे, सुरेश वाघमारे, विपुल देगलूरकर, परमेश्वर गंगासागरे, दिनेश सोनटक्के, सुहास गंगासागरे यांच्या सह्या आहेत.