नांदेड/हिंगोली| ग्रामीण भागातील नागरिकांत विशेषत: तरुणांमध्ये पोहोचलेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ ही योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगांव येथून करण्यात आला असून, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.
दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मौजे नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. सदर ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गाव पातळीवर तयार झालेल्या ‘तंटामुक्त गाव समिती’, ‘ग्राम रक्षक दल’ व महिलांच्या ‘दुर्गा व्यसनमुक्त गाव समिती’ यांच्या माध्यमातून गावात व्यसनांचा शिरकाव होऊ न देण्याचे आवाहन नर्सी नामदेव येथील ग्रामस्थांना केले. सदर कार्यक्रमादरम्यान हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीही व्यसनमुक्तीसाठी पोलिसांना सक्रियपणे मदत करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
सदर कार्यक्रमासाठी, हिंगोलीच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, नर्सी नामदेव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बद्रीनाथ सानप, गावातील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री भिकाजी कदम, दुर्गा व्यसनमुक्त गाव समितीच्या अध्यक्षा श्रीमती आयोध्याताई कीर्तनकार, ग्रामरक्षक दलाचे जवान व ग्रामस्थ उपस्थित होते.
व्यसनमुक्त गाव मोहिमेच्या यशस्वीतेसाठी, ऑक्टोबर महिन्यात, नांदेड परिक्षेत्रातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात येऊन, तंटामुक्त गाव समित्यांची निर्मिती करण्यात आली असून, ग्रामरक्षक दल व दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. गाव पातळीवर तयार झालेल्या उपरोक्त समित्या दारू, गांजा, गुटखा इत्यादी व्यसनांची साधने गावात पोहोचू न देण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत करत आहेत. पुढील काळात, जनजागरण, ग्रामस्थांची व्यसनविरोधी भूमिका व अवैध व्यवसायांविरोधी पोलिसांची कारवाई या माध्यमातून सदर योजना यशस्वी करण्याचा पोलिस दलाचा प्रयत्न असून, परिक्षेत्रातील जबाबदार नागरिकांनी सदर योजना यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.