भोकर/नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तहसील कार्यालयात कार्यरत तत्कालीन लोकसेवक सुनिता दत्तात्रय गोपेवाड, वय 36 वर्षे, लिपिक यांनी आंदेगाव येथील शेत गट क्रमांक 225 ची फेरफारची नक्कल देण्याच्या कामासाठी लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषसिद्धी अहवाल सादर झाल्यानंतर दिनांक 31 बुधवारी भोकर येथील मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी तीन वर्ष कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास तीन महिन्याचा वाढीव कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्याची हकिकत अशी कि, यातील तक्रारदार माधव राजाराम थोटे वय 63 वर्षे यांना त्यांचे मौजे आंदेगाव येथील शेत गट क्रमांक 225 ची फेरफारची नक्कल देण्याच्या कामासाठी आरोपी लोकसेविका सुनिता दत्तात्रय गोपेवाड, वय 36 वर्षे यांनी लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच स्वीकारली होती. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडून पोलीस स्टेशन हिमायतनगर, जि.नांदेड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 78/2016कलम 7, 13 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अनुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या तपास तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक बी.एल.पेडगावकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी तपासाअंती सबळ पुराव्यासह मा. न्यायालय भोकर येथे आरोपी लोकसेविका सुनिता दत्तात्रय गोपेवाड यांचे विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावरून स्पेशल केस क्रमांक विशेष न्यायालय, भोकर येथे खटला क्र. 02/2016 आरोपी विरुद्ध चालू होता.

त्या खटल्यात दोन्ही बाजू ऐकून घेऊन मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय एम एच खरादी भोकर – 1 यांनी पोलीस स्टेशन हिमायतनगर, जि. नांदेड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 78/2016 कलम 7, 13 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मध्ये आरोपी लोकसेविका यांचेविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मध्ये 1 वर्षाचा कारावास व 1,000/- रुपये द्रव्यदंड आणि कलम 13 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मध्ये 2 वर्षाचा कारावास व 3,000/- रुपये द्रव्यदंड आणि द्रव्यदंड न भरल्यास तीन महिन्याचा वाढीव कारावास अशी शिक्षा आज दिनांक 31 जुलै 2024 रोजी सुनावली आहे. या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून श्रीमती शैलजा पाटील आणि श्रीमती अनुराधा गोवर्धन रेड्डी यांनी चार साक्षीदार तपासून सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली होती. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जमीन नाईक, पोलीस निरीक्षक बी.एन.थोरात, पोलीस नायक प्रदीप कंधारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी काम पहिले आहे.



