हिमायतनगर| तालुक्यातील सरसम बु.येथील बसस्टॉपवर महामंडळ बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या एका वृद्ध नागरीकांस भरधाव वेगातील ट्रक ने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका जेष्ठ नागरीकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना दि. १६ मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सरसम बु. येथील नारायणराव शिंदे वय ७१ वर्ष हे हिमायतनगरला जाण्यासाठी सरसम बसस्टॉपवर छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून लावलेल्या झंडा असलेल्या त्या ओट्यावर थांबले होते. तर वाळकेवाडी कडून सरसम बु. बसस्टॉप चौक येथे क्रेटा कंपनीची कार एम. एच. २६ सी. इ. ०७०५ ही देखील रस्ता क्रॉस करीत होती. दरम्यान भोकरकडून बाराचाकी वाहन ट्रक एम. एच. २६ सी. एच. १७४६ हे भरधाव वेगात आले. क्रॉस करणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात छत्रपती शिवाजी महाराज चौक ओट्यावर थांबलेल्या जेष्ठ नागरिक नारायण शिंदे यांना ट्रक ने जोराची धडक दिली.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
या दुर्दैवी घटनेत ओटा व छत्रपती शिवाजीमहाराज यांचा भगवा झेंडा व नारायण शिंदे हे अक्षरशः दहा फूट उंच उडून ते खाली कोसळले. या दुर्दैवी घटनेत ७१ वर्षीय नारायणराव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत उत्तरीय तपासणी साठी प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथे ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी भेट देऊन पंचनामा केला. कारचे थोडीफार नुकसान झाले असून कारमधील सर्वजन सुखरूप आहेत. वृत लिहीपर्यंत हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)