Special Trains : गुरु तेगबहादूर साहिब जींच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी नांदेडला विशेष रेल्वे सेवा

नांदेड, अनिल मादसवार| हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडमध्ये २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या भव्य शहिदी समागमासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ‘ट्रेन ऑन डिमांड (TOD)’ अंतर्गत दिल्ली (हजरत निजामुद्दीन), चंदीगड आणि मुंबई येथून थेट नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे.


🚆 दिल्ली–नांदेड विशेष रेल्वे – उत्तर भारतातील भाविकांसाठी हजरत निजामुद्दीन–नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) ही राखीव सुपरफास्ट विशेष गाडी दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता दिल्लीहून सुटणार पानिपत, आग्रा कॅन्ट, झाशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता नांदेडला आगमन होईल.

🚆 चंदीगड–नांदेड विशेष रेल्वे – चंदीगड–नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) दिनांक २३ व २४ जानेवारी सकाळी ५:४० वाजता चंदीगडहून सुटणार असून, अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, झाशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता नांदेडला पोहोचणार आहे.


🚆 मुंबई–नांदेड विशेष रेल्वे – महाराष्ट्रातील भाविकांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस–नांदेड (गाडी क्र. ०१०४१/०१०४२) दिनांक २३ व २४ जानेवारी दुपारी ३:३० वाजता मुंबईहून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता नांदेड आगमन होऊन ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबेल. आणि परतीचा प्रवास दिनांक २४ व २५ जानेवारी रात्री ११:३० वाजता नांदेडहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १:४० वाजता मुंबई आगमन होईल, या गाड्यांमध्ये १८ डबे असून स्लीपर, जनरल व एसी कोच उपलब्ध असतील.

या सेवेमुळे भाविकांसाठी मोठा दिलासा मिळणार असून, या विशेष रेल्वे सेवेमुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली व महाराष्ट्रातील हजारो भाविकांना नांदेडपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षा, स्वच्छता व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, शहिदी समागम निर्विघ्न पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हिंद दी चादर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नांदेड सज्ज होत असताना, ही विशेष रेल्वे सेवा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धेचा आणि सुविधेचा संगम ठरणार आहे.



