हिमायतनगर, प्रतिनिधी | येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ भरविण्यात येणाऱ्या बुधवारच्या आठवडी बाजारामुळे गंभीर रुग्णांना रुग्णालयात ने-आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच आठवडी बाजार भरविला जात असल्याने बाजारातील दुकाने थेट रस्त्यावर लागतात. त्यामुळे रुग्णवाहिकेला रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. विशेषतः अपघातग्रस्त, अतिगंभीर रुग्ण तसेच गरोदर महिलांना रुग्णालयात आणताना मोठा विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

बाजारामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होत असल्याने रुग्णवाहिकेला मार्ग काढणे कठीण होते आणि यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता हिमायतनगर येथील आठवडी बाजार पूर्वीच्या जागेतच भरविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



तसेच ग्रामीण रुग्णालयाजवळील बाजारामुळे भविष्यात कोणतीही गंभीर घटना घडू नये यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.




