नांदेडमहाराष्ट्र

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

नांदेड| पारंपरिक कारागिरीला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून होत असून, कारागिरांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.

एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि खादी ग्रामोद्योग मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, जिल्हा उद्योग केंद्र व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

५ व ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असून, कारागिरांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुतार, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई व झाडू निर्माते, बाहुली व पारंपरिक खेळणी तयार करणारे कारागीर, मालाकार आदी विविध क्षेत्रांतील विश्वकर्मा बांधवांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ३३ हजारांहून अधिक कारागिरांची नोंदणी झाली असून, ४ हजारांपेक्षा जास्त कारागिरांना कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच हजारो कारागिरांना टूलकिटचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांनी दिली.

या प्रदर्शनात सुमारे ५० कारागिरांचे स्टॉल्स लावण्यात आले असून, नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी येथेही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button