Painganga River Is Dry Himayatnagar City Water Problem ; पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट असल्याने पाणी टंचाईने केले रौद्ररूप धारण

हिमायतनगर, अनिल मादसवार। विदर्भ मराठवाडा सीमेवरुन वाहणारी पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर शहरातील सार्वजनिक विहीर व 500 फूट खोल असलेल्या बोअरवेलची पाणी पातळी खाली गेली असून, घराघरातील शेकडो विंधनविहिरी अक्षरशः बंद पडल्या आहेत. त्यातच मंजूर नळयोजनेचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तासंतास नंबर लावून बोअरवेलवर पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. नगरपंचायत प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर न सोडता तात्काळ पाण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.



हिमायतनगर शहराची तहान भागविण्यासाठी 19 कोटी 19 लक्ष रुपयांची नळयोजना मंजूर झाली मात्र ही नळयोजना आजही थंडबसत्यात आहे, नळयोजनेचे काम ठेकेदार यांच्याकडून थातुरमातुर पद्धतीने केल्या गेल्याने 5 वर्षांपासून नळयोजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शहरात ठिकठिकाणी जलकुंभ उभारले, शहरात पाईपलाईन केली मात्र अजूनही नळाला पाणी आले नसल्याने शहरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे, पैनगंगा नदीला देखील पाणी नसल्याने हिमायतनगरच्या घराघरातील बोअरवेल बंद पडल्याने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.


हिमायतनगर शहरातील जवळपास संपूर्ण प्रभागात पाणी समस्येने रुद्र रूप धारण केले असून, पावसाळ्याला आणखी दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाने पाणी समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी आणि प्रशासकीय यंत्रणेने इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडावे जेणेकरून हिमायतनगर शहरातील बंद पडलेले बोअरवेल सुरू होतील अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली असून, अन्यथा महिलां मंडळी पाण्यासाठी नगरपंचायत वर घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.



हिमायतनगर शहरातील पाणीटंचाईची भीषण स्थिती लक्षात घेता भाजप युवा कार्यकर्ते शेकडो महिलांसह नगर पंचायत कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ काढणार आहेत. यानंतरही जर नगर पंचायतीने शहरवासीयांचा पाणी प्रश्न सोडवला नाही, तर येत्या काळात पाणीपुरवठ्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही युवा कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी दैनिक गावकरी शी बोलताना सांगितले.
हिमायतनगर येथील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध समस्या बाबत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या मुख्यत्वे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी बैठक घेण्यात येईल असे सांगितले होते मात्र अद्याप यास मुहूर्त मिळाला नाही किमान आता तरी जनतेचे तीव्र पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता तातडीने बैठक घेऊन ही समस्या मार्गी लावतील का..? असा प्रश्नही पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला मंडळींनी उपस्थित केला आहे.




