
नांदेड| नांदेडच्या गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी छापा मारून पुन्हा एका धडाकेबाज कार्यवाही केली आहे. या कारवाईत त्यांनी 6,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. रेती उपसा करणारे वाहन, यंत्रसामग्री यासह संबंधित साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज (रेती) उपसा व वाहतुक करणारे लोकांवर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून दिनांक 29.07.2025 रोजी चे 12.00 वा सुमारास त्यांनी भनगी शिवारातील गोदावरी नदीपात्रातुन छापा टाकला. यावेळी काही रेती माफीया हे इंजिन व तराफ्याच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करुन रेतीची नदीकाठावर साठवणूक करीत होते. यावेळी दोन आरोपी पोलीसांना पाहून नदीमध्ये उडी मारुन पलीकडच्या किनाऱ्यावर पोहून पळून गेले.


सदर ठिकाणी नदीपात्रातुन अवैधरित्या उपसा करुन किणाऱ्यावर आणुन साठविलेली अंदाजे 5 ब्रास रेती किंमत 25,000/- रुपये, पाण्यातुन रेती उपसा करणारे 02 इंजिन किंमत अंदाजे 4,00,000/- रुपये, रेती उपसा करण्यासाठी वापरलेले एकुण 04 तराफे किमत 2,00,000/- रुपये असा एकुण 6,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला/काही मुद्देमाल कटरने कापुन व तोडुन जाळुन जागीच नष्ट करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार वेगवेगळ्या चार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.






