नवीन नांदेड l महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांतूनच भविष्यातील असंख्य कलावंतांची जडणघडण होत असते म्हणून स्नेहसंमेलनातील विविध सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सक्रिय राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी केले. वसंतराव नाईक महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन, पारितोषिक वितरण आणि समारोप कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी झी मराठी – ‘चला हवा येऊ द्या फेम’ सतीश कासेवार, प्रख्यात गायिका शीतल अभ्यंकर यासारख्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनातून आपले सुप्त कौशल्ये विकसित असे गौरव उद्गार यावेळी डॉ.नानासाहेब जाधव यांनी काढले.

या प्रसंगी डॉ.नानासाहेब जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाची शपथही दिली. या समारंभासाठी व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शांतादेवी जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय सिडकोचे प्राचार्य डॉ.सुरेश घुले, प्रख्यात गायिका शितल अभ्यंकर, झी- मराठी चला हवा येऊ द्या फेम- सतीश कासेवार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.आर.राठोड, हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.रेणुका मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख, स्नेहसंमेलन प्रभारी प्रो. डॉ. नागेश कांबळे,कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पी. बी. चव्हाण, डॉ. अनिल गच्चे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी केले.

याप्रसंगी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने तयारी करण्याचे आवाहन केले.स्नेहसंमेलनाच्या आनंदा बरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याकडे नजर ठेवून परिश्रम घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केले.

त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून दिले. प्रभारी प्राध्यापक प्रोफेसर डॉ.नागेश कांबळे यांनी स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि बदलते शैक्षणिक धोरण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सतीश कासेवार यांच्या मिमिक्रीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.
त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायिका शितल अभ्यंकर यांनी आपल्या सुरेल आवाजात कराओके आधारित चित्रपट गीतांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरून टाकले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला आणि स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ.साहेबराव शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.