नांदेड| जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाचे काम जून २०२६ पर्यंत तर रेणापूर सुधा प्रकल्पाच्या उंची वाढवण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. श्रीजया चव्हाण यांना दिले आहे.

बुधवारी सकाळी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्पांसंदर्भात भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पिंपळढव साठवण प्रकल्पाचे काम आणि रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने भूसंपादन व प्रकल्पांच्या कामासाठी निधी देण्याची तसेच हे प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याची मागणी त्यांनी आपल्या प्रश्नातून केली होती.

आ. श्रीजया चव्हाण यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पिंपळढव साठवण तलावामुळे ६६० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, त्यासाठी २१२ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन आवश्यक आहे. त्यापैकी १७८ हेक्टर जमीन संपादित झालेली आहे. या प्रकल्पासाठी आजवर ३३.३३ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. चालू आर्थिक वर्षात भूसंपादनाकरिता केलेली २० कोटी रुपयांची तरतूद पूर्ण करण्यात येईल. प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, जून २०२६ किंबहुना त्यापूर्वीच काम पूर्ण करून या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्याचा आमचा प्रयत्न आहे.


रेणापूर सुधा बृहद लघू पाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढवण्याच्या कामाबाबत विखे पाटील म्हणाले की, या विकासकामाला ४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. उंची वाढल्यानंतर प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत सुमारे १ टीएमसी वाढ होणार आहे. रेणापूर सुधा प्रकल्पाच्या भूसंपादना करिता ८.१४ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, आणखी १५ कोटी रुपये लागणार आहेत. हे काम दोन महिन्यात पूर्ण करून प्रकल्पात पाणी साठवले जाईल व संबंधित देयके दिली जातील, असेही त्यांनी आपल्या उत्तरात आश्वस्त केले.


