Thursday, May 14

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा – NNL

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला.

दि. २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. जनार्दन गोपिले हे होते. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आयुष्यातील केलेला संघर्ष व भारताचे नावलौकिक वाढविण्यात दिले गेलेले योगदान याबद्दल श्री. गोपीले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आजचा तरुण हा भारताचे भविष्य आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणांनी शारीरिक सुदृढ असणे आवश्यक आहे. रोगापासून वाचवायचे असेल तर प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे, तरच भविष्यातील निरोगी पिढी तयार होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करून ते अंगीकारले पाहिजे, खेळाडूने खेळामध्ये ‘मी’ पणा कमी करून सांघिक भावना जपली पाहिजे. तरच खेळाचा उद्देश सार्थ होईल आणि खेळाडू खेळाला न्याय देऊ शकेल. आधुनिक युगामध्ये मोबाईल सारख्या साधनांपासून विद्यार्थ्यांनी थोडं दूर राहिलं पाहिजे तरच तो खऱ्या अर्थाने स्वत:ची प्रगती करू शकेल. व आपले करिअर घडवू शकेल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सिंकू कुमार सिंह, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातील कर्मचारी संजयसिंह ठाकूर, हसन मुजीब, सुनील लुटे, शिवाजी हंबर्डे, श्री रतनसिंह पुजारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भीमा केंगले यांनी केले तर आभार प्रदर्शन लखन कारले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!