किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील बोथ येथे गॅस्ट्रोमुळे एका महिलेसह पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जुलाब उलटी या आजाराने ग्रस्त असून आरोग्य विभागाची टीम उपचार करीत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी बाजार केंद्रांतर्गत येत असलेल्या खंबाळा उपकेंद्रातील बोथ येथील दोन जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती अभावी एक वर्षापासून धूळ खात पडून आहेत. नाईलाजास्तव गावकऱ्यांना एकाच बोर वरील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. भर पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाणी पिल्याने कल्पना मारुती आत्राम वय ३७ यांना जुलाब व उलटी झाल्याने मांडवी येथील रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात सांगितले होते. उपचारासाठी नेत असताना मध्यरात्री दोन वाजता आदिलाबाद जवळ त्या महिलेचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे व दीर असा परिवार आहे. तर बोथ येथे पाहुणे म्हणून आलेले परशा तोडसाम वय ४७ यांनाही त्रास होत असल्याने उपचारासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाही मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मीबाई शामराव कन्नलवार व गीता लक्ष्मण धुर्वे यांच्यासह आठ ते दहा रुग्णांवर उपचार सुरू आहे. सध्या बोध गावात आरोग्य पदक दाखल झाले असून नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत.