हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरासह तालुकाभरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पंचशील ध्वजारोहण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचीत्राची भव्य अशी मिरवणुक काढून अभिवादन करण्यात आले. दरम्यान 4 वाजता आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भेट देऊन भीमसैनिकांना शुभेच्छा देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी मोठ्या प्रमाणात महिला-पुरुषांनी जयंती शोभायात्रेत सहभाग घेतला होता.




भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बौद्धीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात जयंती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून निळी सलामी देण्यात आली. हिमायतनगर शहरात सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजरोहन करून नालंदा बौद्ध विहारात सामुदायिक पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून डॉ. बाबासाहेबांच्या तैलचित्राची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दरम्यान मुख्य चौकात शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले, तसेच युवकांनी डीजेच्या तालावर आणि भिमगीतांच्या सुरावर ठेका धरला होता. बौद्ध उपासक – उपासिका महिला, पुरुषांनी मिरवणुकीत उपस्थित होऊन शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.



शोभायात्रा शहरातील प्रमुख चौकात येताच राजकीय नेते व बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आदरांजली वाहिली. शहरातील गणेश चौकात मिरवणूक येताच शोभा यात्रेत सामील झालेल्या अनुयायांना भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन चायल यांच्यातर्फे सरबत वितरित करून शोभायात्रेच स्वागतं करण्यात आले. तसेच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शोभा यात्रा सुरू असताना सायंकाळी 4 वाजता भेट दिली, महात्मा फुले चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून उपस्थित भीमसैनिकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.



सदर मिरवणूक शहरातील चौपाटी, पोलीस ठाणे, बाजार लाईन, गणेश चौक, बजरंग चौक, सराफा लाईन, महात्मा फुले चौक, श्री परमेश्वर मंदिर, लकडोबा चौक, परत आंबेडकर चौक ते लुम्बिनी बौद्ध विहारात आल्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


