हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथे एका 75 वर्षीय वृद्ध आजीच्या तोंडात कापड कोंबून तिचा खून करून २ लक्ष ७४ हजार रुप्याचे दागिने व नागडी रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना दिनांक ३ जून रोजीच्या रात्रीला घडली आहे. गयाबाई रामजी तवर असे मयत आजीचे नावं असून, याबाबत हिमायतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथील महिला गयाबाई रामजी तवर/ देवसरकर या एकट्याच राहत होत्या. मयत महिलेच्या नावाने नऊ एकर जमीन व स्वतःचे घर आहे. तिन्हींही मुलींचे लग्न झालेले असल्याने त्या सर्वजण आपल्या सागरी राहतात. मयत गयाबाई रामजी तवर यांनी सोमवारी बैन्केतून ९० हजारांची रक्कम काढून आणली होती. तसेच मुलीकडे ठेवलेले २३ ग्राम सोन्याचे दागिने ०१ लक्ष ८४ हजार किंमत असलेले दागिने घेऊन घरी आली होती. याची खबर लागलेल्या मयत महिलेचा नातू मारोती उर्फ बाळू पांडुरंग वानखेडे वय ३५ वर्ष याने राहणार दिघी तालुका हिमायतनगर याने आजीच्या घरात प्रवेश करून आजीला मारहाण करून दागिने व रक्कम जबरीने काढून घेऊन खून केला आहे.

गुरुवारी रात्रीं मयताच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मयत महिलेच्या मुलीसह नातेवाईकांच्या उपस्थितीत घराचे दार उघडताच गयाबाई यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी घातपात असल्याची शंका नातेवाईकांनी व्यक्त केली होती. त्या दिशेने पोलिसांनी तपास करून याबाबत मृत महिलेचे जावई किशनराव दत्तराव वानखेडे राहणार टाकळी ता. उमरखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम १०३ (१) ३०९ भारतीय न्याय संहिता २०२३ कायदयानुसार आजीचा खून करणाऱ्या नातवाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी पाटील हे करत आहेत.
