
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| राज्यात वाढत्या डिझेल दरांमुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या ट्रॅक्टरमध्ये मर्यादित प्रमाणात दिले जाणारे डिझेल अपुरे पडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या १५०० रुपयांच्या डिझेलमध्ये शेतीची कोणतीच कामे पूर्ण होत नाहीत. नांगरणी, पेरणी, मशागत यांसारखी महत्त्वाची कामे अर्धवट राहतात. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी किमान ३ ते ४ हजार रुपयांचे डिझेल देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

विशेष म्हणजे, शेतात काम सुरू असताना ट्रॅक्टर बंद पडल्यास तातडीने डिझेल उपलब्ध होत नाही. डब्यातून डिझेल देण्याचीही सुविधा अनेक ठिकाणी नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ट्रॅक्टरसाठी डिझेल मर्यादा वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा शेतीची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





