नांदेड| शालेय शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि आगामी शिक्षक बदली प्रक्रिया या संदर्भाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन विचारविनिमय केला. यावेळी त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून बदली मागणाऱ्यांची रँडम तपासणी करून दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समाधानकारक नसून मुलांना लिहिता वाचता आले पाहिजे. गणिती क्रिया इयत्ता नुसार करता आल्या पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे आहे. तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेने याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगून यावेळी त्यांनी गटशिक्षणाधिका-यांचा आढावा घेतला.
आपल्या तालुक्यातील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत, या संदर्भाने चिकित्सा करण्याचे आवाहन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी यांनी शाळाभेटी करून मुलांची गुणवत्ता तपासावी. तसेच 30 डिसेंबरपर्यंत अध्ययन स्तर निश्चित करून घ्यावा. शाळांना भेटी द्याव्यात. गुणवत्ता तपासणी करावी आणि संबंधितांना याबाबत जाब विचारावा. यावेळी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षकांना देण्यात येण्यात येत असलेले अतिरिक्त काम, टपाल वेळोवेळी माहिती मागण्यात येते. याकडे संघटनांनी लक्ष वेधले.
बैठकीस प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार सर्व गटशिक्षणाधिकारी, विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्षकांच्या सार्वत्रिक ऑनलाईन बदल्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होत असून त्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विभागाला दिली. शिक्षक बदली प्रक्रियेत संवर्ग एक मध्ये अनेक शिक्षक अर्ज करीत असतात. संबंधित शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र काढल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. रँडम पाच टक्के संवर्ग एक मध्ये अपंगत्वाचा दिव्यांगाचा लाभ घेऊन बदली करून घेणाऱ्याची चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे मीनल करनवाल यांनी सांगितले.