Festival of King Shiralsheth : शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा -NNL

हिमायनगर,अनिल मादसवार| नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. नववधू सहित महिलांनी श्रियाळ राजाच्या भोवताली गाणे म्हणत गोल फिरत आराधना केली. त्यानंतर सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्याने श्री परमेश्वर मंदिरापर्यंत श्रियाळ राजाची मिरवणूक काढून शिराळबाई शिराळ….. शिराळाच्या लाह्या… असे म्हणत परंपरेनुसार महाआरती करून शंभूच्या नावाने हरहर बोला म्हणत विसर्जन केले.



याबाबात एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे पैठण येथे इतिहास प्रसिद्ध गर्भश्रीमंत शहरात शिराळशेठ के एक सावकार होते. त्या काळात दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यासाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार असलेले शिराळशेठ परंतु मनाने उदार होते. त्या काळी त्यांनी स्वत: जवळ असलेल्या धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्याचा निर्णय घेऊन ती दक्षिण भारतात स्वखर्चाने वितरित केला व लाखो लोकांचा जीव वाचविला. तत्कालीन आदिलशाह राजाने शिराळशेठ यांचे दातृत्व ओळखून त्यांना सत्काराचे निमंत्रण दिले. सत्कार प्रसंगी काहीही मागावे असे शिराळशेठ याना सूचित केले. यावर धनदौलत न मागता शिराळशेठ यांनी साडेतीन घटकेसाठी मला राजा करा, अशी विनंती राजाकडे केली. तत्कालीन राजाने मान्य करून शिराळशेठला साडेतीन घटकेचा राजा केले. राजा होताच शिराळशेठ यांनी गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला. नाण्याचा शिक्का चामड्यावर मारून त्याचा पैशाच्या रूपात वापर करण्याचा निर्णय घेतला.


शिराळशेठ हे शिवभक्त असल्याने त्यांच्या उपकाराचे विस्मरण होऊ नये म्हणून व दानशूर लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांचा मानसन्मान व्हावा या हेतूने पैठण-पुणे येथे हा लोकोत्सव साजरा होत आहे. श्रीयाळषष्ठी निमित्त हा उत्सव महाराष्ट्रात विविध ठिकाणी साजरा हो असून, याचेच प्रतीक म्हणून शिराळ पंचमी सणाच्या दुसऱ्या दिवशी हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात श्रियाळ राजाचा उत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी सकाळी मातीचा राजवाडा तयार करून यात श्रियाळ राजाची प्रतिमा बसून अन्न अन्न धान्याने सजवून श्रियाळ राजाचे प्रतिकामक पूजन करून नववधू सहित महिलांनी भुलाई गाणे म्हणत त्या भोवताली गोल फिरत आराधना केली. त्यानंतर सायंकाळी शहराची मुख्य रस्त्याने मिरवणूक काढून हिमायतनगर शहराची महिलांनी येथील श्री परमेश्वर मंदिरात परंपरेनुसार महाआरती करून विसर्जन केले. या उत्सवात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.






