नांदेड| इमारत व बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगारांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दि. १२ जून रोज गुरुवारी मोर्चा सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून निघेल. सदरील मोर्चा मध्ये इमारत व बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगारांनी सामील व्हावे असे आवाहन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


कामगार संघटणांनी अथक परिश्रम करून ४४ कामगार कायदे तयार केले असून सरकार ते कायदे रद्द करू पाहत आहे. चार श्रम संहिता आणि विशेष जनसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध होत असताना सरकार मनमानी करीत आहे. ज्या ज्या कामगारांचे नूतनिकरण व नोंदी आहेत त्यांना सरसगट भांडे संच आणि सर्व लाभ देण्यात यावेत. कामगार कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी यांची मनमानी हाणून पाडण्यासाठी व कामगारांच्या मुलाबाळाच्या शिष्यवृत्ती वेळेवर मिळाव्यात म्हणून नोंदीत व इतर सर्व कामगारांनी मोर्चात सामील होऊन सरकारचा आणि कामगार कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध करणे आवश्यक आहे.

ज्या ज्या कामगारांकडे नोंदीत लेबर कार्ड किंवा प्रमाणपत्र असेल त्यांनी ते सोबत घेऊन यावे. विविध योजनाचा व भांडे वाटपाचा लाभ जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करण्यात येणार असून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात जोरदार आवाज उठवून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेचे सचिव अब्दुल वसीम अब्दुल सलीम यांनी केले आहे.
