Police action on sand ghat : बिलोली तालुक्यातील गंजगावच्या रेती घाटावर पोलिसांची कारवाई
बिलोली, गोविंद मुंडकर| बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील रेती घाटावर पोलीस पथकाने अचानक धाड टाकून दोन जे. सी. बी सह रेती वाहतूक करणारी वाहणे ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पुढाकाराने आणि एस पी अबिनाश कुमार आदेशानुसार देगलूरच्या उप विभागीय पोलीस अधिका-यांनी ही कारवाई केली आहे. विषेश म्हणजे स्थानिक पोलीसांना टाळून देगलूरच्या उप विभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे बिलोली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


लाल रेती साठी प्रसिद्ध असलेल्या बिलोली तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गंजगाव येथील रेती घाटावर नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार देगलूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोस्वामी यांच्या पथकाने दि. ११ फेब्रुवारी रोजी अचानक धाड मारली. या धाडीत सदर घाटावर रेती उत्खनन करणा-या दोन जे. सी. बी यंत्रांसह २० ते २५ रेती वाहतूक करणारी वाहणे आढळुन आल्याचे सांगण्यात आले.

सध्या पथकाने टाकलेल्या धाडी वेळी पकडण्यात आलेल्या रेती वाहतूक करणा-या वाहन चालक आंकडे रेती वाहतूकीचा परवाना आहे की नाही याची चौकशी करण्यात येत आहे.सर्व वाहनांच्या चौकशी नंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे देगलूरच्या पथकाने टाकलेल्या या धाडीत दोषी असणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने पुढील कारवाई होईलच.


मात्र काही दिवसांपूर्वीच बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस स्थानकातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना रेतीच्या प्रकरणातच लाच घेताना पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना आत्ता देगलूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने बिलोलीत येऊन केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.




