हिमायतनगर| तालुक्यातील बोरगडी येथे शेतात मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना रविवार दिनांक १९ सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले असून शासनाने मयताच्या कुटूंबीयास अर्थिक मदत देवून दिलासा द्यावा. अशी मागणी केली जात आहे.

बोरगडी येथील महेश्वर आडेलू शेनेवाड वय ५० वर्ष हे आपले शेत सर्वे नंबर ९५ मध्ये पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील मक्याला पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तनकटात लपलेल्या अंदाज न आल्याने विषारी सापावर त्यांचा पाय पडल्याने सापाने कडाडून चावा घेतला. गंभीर जखमी शेतकऱ्यांस उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत महेश्वर आडेलू शेन्नेवाड वय ५० वर्ष यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मयत शेतकरी अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने बोरगडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले असून शासनाने मयताच्या कुटूंबीयास अर्थिक मदत देवून दिलासा द्यावा. अशी मागणी केली जात आहे.
