लेखनांदेड

S. Ravinder Singh Modi : शीख समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व – स. रविंद्रसिंघ मोदी

पत्रकारिता हे एक अफाट आणि प्रभावी क्षेत्र आहे. ग्रामीण भागात राहूनही मी नांदेड शहरातील पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे अनेक थोर व्यक्तींशी परिचय होण्याचा योग आला. अशाच व्यक्तींमध्ये एक व्यक्तिमत्त्व असे आहे ज्यांच्याविषयी मला नेहमीच विशेष आकर्षण वाटत आले आहे- ते म्हणजे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते स. रविंद्रसिंघ मोदी. मनमिळावू, संयमी आणि अभ्यासू स्वभावाचे धनी असलेले स. मोदी यांच्याशी माझे पारिवारिक नाते केव्हा निर्माण झाले, हे कळलेच नाही. गेले वीस वर्षे मी त्यांना ओळखतो.

नांदेडमध्ये राहून त्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी आणि तेलगू या चारही भाषांमधील वृत्तपत्रांतून लिखाण करून बहुभाषिक पत्रकारितेचा एक आगळा आदर्श निर्माण केला आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्त्व मराठवाड्यात दुर्मिळच म्हणावं लागेल. विशेषत: 2008 साली नांदेडमध्ये पार पडलेल्या गुरुतागद्दी त्रिशताब्दी महोत्सवाच्या वेळी त्यांनी दाखवलेली निःस्वार्थ, सखोल आणि जागरूक पत्रकारिता आजही उदाहरण म्हणून सांगितली जाते. त्यांच्या लेखनातली धार आणि विषयांची प्रखरता आजही तितकीच ठळकपणे जाणवते. ते शीख समाजातील एक प्रखर वक्ता म्हणूनही परिचित आहेत.

नांदेड शहरातील सामाजिक विषयांप्रमाणेच शीख समाजाच्या प्रश्नांविषयीही त्यांची असलेली तळमळ नेहमी जाणवते. मात्र, एक खंत वाटते ती म्हणजे एवढं मोठं योगदान देऊनही पत्रकारिता क्षेत्रात आणि शीख समाजात त्यांना अपेक्षित सन्मान मिळालेला नाही. स्वतंत्र वार्ता, लोकमत समाचार, दैनिक भास्कर, दैनिक सकाळ, दैनिक अजीत, दैनिक प्रतिदिन अशा अनेक प्रमुख वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली आहे. स्थानिक वृत्तपत्रांतही त्यांचे लेख आणि बातम्या नियमित प्रसिद्ध होत असतात. शीख धर्माच्या सण-उत्सवांवरील त्यांचे लेख अभ्यासपूर्ण असतात, तर समाजातील समस्यांवरचे त्यांचे लिखाण आक्रमक आणि जागृती करणारे असते.

तीन दशकांच्या पत्रकारितेच्या वाटचालीत त्यांनी एक स्वच्छ, अभ्यासू आणि सजग पत्रकार अशी ओळख निर्माण केली आहे. गुरुद्वारा बोर्ड कायद्यातील कलम ११ संदर्भातील संशोधन आणि आंदोलन त्यांनीच खऱ्या अर्थाने सुरू केलं. या विषयावर त्यांनी शासनाला वेळोवेळी प्रश्न विचारले. अनेक नामवंत राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांची आक्रमक, मुद्देसूद शैली विशेष चर्चेचा विषय ठरते. माजी केंद्रीय गृहमंत्री बूटासिंह, योजना आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेकसिंह अहलुवालिया, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव या आणि अशा असंख्य नेत्यांना त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये अभ्यासू प्रश्न विचारून विचारमंथन घडवून आणले आहे.

जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते स. रविंद्रसिंह मोदी यांना एक अभ्यासू आणि जिज्ञासू पत्रकार म्हणून ओळखतात – जसे की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, खासदार डॉ. अजीत गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, हेमंतभाऊ पाटील, डॉ. वेंकटेश काबदे, आमदार बालाजीराव कल्याणकर, नूतन आमदार आनंदराव तिडके बोंढारकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे आदी. त्यांना नांदेडच्या विकासाबाबत आणि शीख समाजाच्या प्रश्नांविषयी प्रखर जाणीव आहे. गुरुद्वाऱ्यात साजऱ्या होणाऱ्या तखतस्नान सणाविषयी त्यांनी सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण लेखन करून त्या सणाचे महत्त्व उजळून टाकले. यापूर्वी या सणाची फारशी माहिती लोकांमध्ये नव्हती. गोदावरी शुद्धीकरण आंदोलन सुरू करत त्यांनी तखतस्नान सणाशी त्याचा संबंध जोडून व्यापक जनजागृती केली. त्यांनी अनेक पत्रकारांना या संदर्भातील माहिती देत या उपक्रमाला प्रसार आणि प्रसिद्धी मिळवून दिली.

ते नेतृत्वक्षम असूनही राजकारणापासून दूर राहून शीख समाजाच्या आणि गुरुद्वाराच्या सेवेसाठी आपला वेळ देतात. सर्व धर्मांविषयी त्यांना जिव्हाळा आहे. श्री दत्त जयंती, गणेशोत्सव यासारख्या सणांबाबतही त्यांचे योगदान लक्षणीय असते. उच्चशिक्षित, प्रभावी वक्ता, प्रामाणिक समाजसेवक आणि पत्रकार असलेल्या स. रविंद्रसिंघ मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
लेखक – आनंदा बोकारे, पत्रकार, नांदेड

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button