नांदेड। येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या इमारतीतील विविध विभागाच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी राज्य शासनाने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतुदही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वांभर पवार यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
येत्या 15 दिवसांत या कामाच्या निविदा जारी होणार असल्याची माहिती इंजि. विश्वांभर पवार यांनी दिली असून आपल्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खा. अशोकराव चव्हाण, माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांचे आभार मानले आहेत.
विष्णुपूरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालय हे जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात सर्वदूर परिचित असलेले महाविद्यालय असून नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील तसेच तेलंगणा, कर्नाटक या परराज्यातील मोठ्या संख्येने रुग्ण दररोज उपचारासाठी दाखल होत असतात. सुमारे 15 वर्षांपूर्वीची ही जुनी इमारत असल्यामुळे इमारतीचे बांधकाम कालबाह्य होत आहे. अनेक विभागात गळती सुरु असल्याने आणि इमारतीची रंगरंगोटी नाहीशी झाल्यामुळे या इमारतीला अवकळा आली आहे. हीच बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वांभर पवार यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची 7 नोव्हेंबर 2023 रोजी भेट घेवून या महाविद्यालयाच्या इमारतीची दयनिय अवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
इमारतीची विभागनिहाय दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी 20 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे निवेदन त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना सादर केले होते. इंजि. विश्वांभर पवार यांनी दिलेल्या निवेदनाची शासनाने दखल घेऊन या निधीला तत्वतः मंजुरी दिली असून अर्थसंकल्पात या निधीची तरतुद करण्यात आल्यामुळे येत्या 15 दिवसांत कामाच्या निविदा निघणार आहेत.
इमारतीच्या अंतररुग्ण विभागाची गळती थांबविणे व रंगरंगोटीसाठी 992.20 लक्ष,बाह्य रुग्ण विभागाची गळती थाबविणे व रंगरंगोटी यासाठी4.36.73 लक्ष, रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाची दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी 342.33 लक्ष आणि अपघात विभाग व केंद्रीय नोंदणी विभागाची दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी 398.04 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी इंजि. विश्वांभर पवार यांनी या निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून इंजि. विश्वांभर पवार यांच्या पाठपुराव्यामुळे डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आता सुशोभीत होणार आहे. रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी इंजि.विश्वांभर पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिंदन होत आहे.
‘ती’दूर्घटनाही टळली असती
डॉ.शंकरराव चव्हाण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांच्या नियुक्त्या आणि रुग्णांना पर्याप्त औषधीसाठा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी इंजि. विश्वांभर पवार यांनी 15 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निविदन दिले होते. या संदर्भातील बातम्या अनेक वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांनी या रुग्णालयात औषधोपचाराविना 24 तासात 24 बालकांचा मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली. इंजि. विश्वांभर पवार यांनी रुग्णालयीन प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीची वेळीच दखल घेतली असती तर त्या निष्पाप बालकांचे प्राण वाचले असते, हे निश्चित.