हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर ते ढाणकी या मार्गावरील मुख्य रस्ता गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचला असून, अद्यापही त्याकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


दिवाळीचा सण सुरू असतानाही या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. उमरखेड–ढाणकी–गांजेगाव–हिमायतनगर–पळसपूर–डोलारी–सीरपली–गांजेगाव–उमरखेड या मार्गावरील एस.टी. बससेवा रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आली आहे. परिणामी, शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.


स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, आमदार आणि खासदारांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हिमायतनगर कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू आहे. कार्यालयात गेल्यास अधिकारी वारंवार अनुपस्थित असतात, तर कर्मचाऱ्यांकडून “साहेब नांदेडला गेलेत” किंवा “दौऱ्यावर आहेत” असेच उत्तर मिळते. त्यामुळे रस्त्यांच्या समस्यांबाबत तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.



फक्त हिमायतनगर–ढाणकीच नव्हे, तर डोल्हारी–पैनगंगा मार्ग, मंगरूळ परिसर आणि इतर अनेक ग्रामीण रस्त्यांचीही अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे, तर काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे खचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. “रस्त्यांची दुरुस्ती नेमकी केव्हा होणार?” असा सवाल संतप्त नागरिक विचारत असून, संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पावले उचलून रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.



