हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीसारख्या स्वच्छतेच्या पर्वकाळातही हिमायतनगर शहरात स्वच्छतेचा गंभीर अभाव निर्माण झाला आहे. परमेश्वर मंदिर बस स्टॉप मैदानासह विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या युवा तालुका शाखेकडून नगरपंचायतीला लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.



संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात नियमित स्वच्छता न केल्यामुळे केरकचरा रस्त्यावर साचत असून, त्यामुळे प्रवासी, व्यापारी व स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बस स्टॉप परिसरासह इतर सार्वजनिक ठिकाणी दिवसेंदिवस अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. संघटनेने नगरपंचायतीकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत त्यामध्ये बस स्टॉप व सार्वजनिक ठिकाणावरील साचलेला कचरा तात्काळ उचलावा, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांसाठी स्वतंत्र कचरा संकलन सुविधा उपलब्ध करून द्यावी, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कामकाजावर देखरेख ठेवावी, मुख्य रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आदींचा समावेश आहे.


“मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास साचलेला कचरा थेट नगरपंचायत कार्यालयात जमा करू,” असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष मुनाभाऊ शिंदे यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून नगरपंचायतीने त्वरित प्रभावी स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.




