हिमायतनगर, अनिल मादसवार| उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा — कोणतंही हवामान असो, केदार ताटेवाड याने गेल्या पाच ते सात वर्षांपासून सातत्याने नागरिकांपर्यंत विविध वृत्तपत्रांची पोहोच सुनिश्चित केली आहे. त्यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण हिमायतनगर शहरात वृत्तपत्र वितरणाची साखळी मजबूत झाली असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार जवळगावकर (Former MLA Jawalgaonkar) यांनी व्यक्त केले.


ते भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त दिनांक १५ ऑक्टोबर रोजी हिमायतनगर येथील वृत्तपत्र विक्रेते केदार ताटेवाड यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यावर माध्यमांशी बोलत होते. शहरातील पत्रकार बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते ताटेवाड यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला.


या प्रसंगी पुढे बोलताना माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले, “ग्रामीण भागातून दररोज वृत्तपत्र वितरणासाठी धडपड करणाऱ्या तरुणाचा आदर्श घेण्यासारखा आहे. समाजात असे परिश्रमी तरुणच माहितीचा प्रवाह जिवंत ठेवतात.” या सत्कार कार्यक्रमामुळे केदार ताटेवाड यांचा परिश्रम व निष्ठेला योग्य तो सन्मान मिळाला असून, समाजात परिश्रमी तरुणांना प्रोत्साहन मिळण्याचा एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.


कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफिक भाई, सभापती जनार्दन ताटेवाड, माजी नगरसेवक अखिल भाई, माजी सभापती प्रकाश वानखेडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, माजी अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, संजय माने, शेख रहिम पटेल, दत्तात्रय तिम्मापुरे, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, अनिल मादसवार, मारोती वाडेकर, नागेश शिंदे, सोपान बोम्पीलवार, मनानभाई, धम्मापाल मुनेश्वर, दत्ता पुपलवाड, माधव यमजलवाड आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्ला गावचे रहिवासी केदार ताटेवाड हा दररोज सकाळी चार वाजता सायकलवरून पाच किलोमीटरचा प्रवास करीत हिमायतनगर शहरात दाखल होतो. उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा या सर्व ऋतूत त्यांने सातत्याने नागरिकांपर्यंत विविध वृत्तपत्र पोचविण्याचे काम केले. त्यांच्या कार्याचा कौतूक केलं तेवढं कमी असल्याचे उदगार जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांनी काढले.


