हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपती बाप्पाचे अनंत चतुर्दशी निमित्त शनिवारी (दि. ६) टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.




गणपती स्थापनेच्या १० व्या दिवशी निघालेली विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता गाजत सुरू झाली. टाळ-मृदंग, ढोल-ताशाच्या गजरात तसेच वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांच्या माउली गीतांमध्ये गणरायाची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. बजरंग चौक, कालिंका गल्ली, बाजार चौक, मारोती मंदिर, सराफा लाईन आदी ठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करत भक्तिभावाने मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले.




मिरवणूक श्री कनकेश्वर तलावाजवळ पोहोचल्यावर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर “तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता” अशा धार्मिक गीतांच्या ओवाळ्यात बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. पुढील वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत बाप्पाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अमल भागात यांनी देखील या मिरवणुकीत सहभागी होऊन मानाच्या गणपतीचे दर्शन घातले.





मिरवणुकीनंतर उत्कर्ष मादसवार यांच्या वतीने प्रसाद वितरण तसेच श्री परमेश्वर मंदिरात भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महिला-पुरुष भाविक, भजनी मंडळातील मंडळी व गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मानाच्या गणपतीचे विसर्जन अविस्मरणीय ठरले.








