हिमायतनगर (अनिल मादसवार) जोपर्यंत शेतकरी एकजुट होत नाहीत तोपर्यंत सरकार झुकणार नाही. शासनाने शेतकरी पेटून उठण्या अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव, कर्जमाफी याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास आगामी काळात नागपूर येथे भव्य आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चुभाऊ कडू यांनी हिमायतनगर तालूक्यातील कामारी येथील मंचावरून दिला.


दिनांक १५ सप्टेंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार बांधवांच्या हक्कासाठी लढा देणारी “हक्क यात्रा” प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाली. कामारीत बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या जनसागराने “आपणा भिडू बच्चू कडू” अशा घोषणा दिल्या. पारंपरिक सर्जा-राजाच्या सजविलेल्या बैलजोडी असलेल्या बैलगाडीत बसवून त्यांची मिरवणूक सभा स्थळापर्यंत काढण्यात आली. मंचावर पोहोचताच प्रथमतः त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले व नंतर शेतकरी व कामगार वर्गाला मार्गदर्शन केले.



सभेत संबोधित करतांना बच्चुभाऊ कडू यांनी केंद्र व राज्य सरकारवर शेतकरी, कष्टकरी आणि दुर्लक्षित समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सडकून टीका केली. ते म्हणाले की,“सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. मग जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणार, हे सरकारने तातडीने जाहीर करावे. अतिवृहस्तीने मोठं नुकसान झाला याबाबत अजूनही मदत दिली नाही, शेतकऱ्यांना असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही. सरकारने निवडणूक पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफीची दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही त्यामुळे तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी. अन्यथा प्रहार संघटनेतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर सोयाबीनचे कुठार घेऊन जाण्याचा इशारा देतो.



शेतकरी म्हणून लढण्यासाठी जोपर्यंत सर्व शेतकरी एकजुट होत नाहीत तोपर्यंत सरकार झुकणार नाही.” तसेच शासनाने लवकरच सोयाबीन खरेदी व कर्जमाफी बाबत भूमिका स्पष्ट न केल्यास नागपूर येथे भव्य आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ७/१२ कोरे करण्याची मागणी केली. तसेच सहस्रकुंड धारण विषयक प्रश्नावर अभ्यास समिती स्थापन करून वस्तुस्थिती जाणून घेऊन पुढील भूमिका जाहीर करण्याचे आदींसह शेतकरी, नागरिक, दिव्यांग, महिला पुरुष यांच्या मागण्यांसह विविध विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


कामारीत झालेल्या या सभेला हिमायतनगर व परिसरातील शेतकरी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रहार संघटनेच्या लढ्यास उत्स्फूर्त समर्थन दर्शविले. हक्क यात्रा यशस्वी करण्यासाठी दत्ता देशमुख सरसमकर, प्रहार जनशक्ती पक्ष हदगाव हिमायतनगर विधानसभा प्रमुख, गजानन विठ्ठलराव ठाकरे कामारवाडीकर, अनिल पाटील कदम, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख हादगाव यांच्यासह प्रहारच्या टीमने परिश्रम घेतले.


