नांदेड| मनपा हद्दीत मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत दिपनगर परिसरातील सिमेंट काँक्रेट रस्त्याची कामे दिवस न करता रात्रीला अंधारात उरकून निष्कृष्ठ दर्जा अवलंबविला जात आहे. या बोगस कामाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी. देयके काढणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करण्यात यावे अशी मागणी सचिन पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख, नांदेड यांनी निवेदन देऊन केली आहे.



नांदेड मनपा हद्दीत दिपनगर येथील सुर्यवंशी यांचे घर ते जोशी यांच्या घरापर्यंत सि.सी. रोड आणि दिपनगर येथील हनुमान मंदिरचे कॉर्नर ते रविंद्र प्राथमिक शाळा पर्यंत सि.सी. रस्ता हे दोन कामे अंदाजपत्रकानुसार होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत योजनेमार्फत मंजूर कामे काही ठेकेदार मनमानी पद्धतीने कामाचे तिन-तेरा करुन शासनाच्या निधीचा गैरवापर करत आहेत.



सर्व सामान्य नागरीकांच्या कराचा पैश्यातून होत असलेल्या विकास कामे महानगरपालिकेतील अभियंता यांच्या कृपा आशिर्वादाने बोगस करून बिले उचलली जात आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर होत असून, या निकृष्ट कामाची देयके अधिकारी स्वार्थापोटी अदा करीत आहे. या कामाची चौकशी करून निष्कृष्ठ दर्जाची कामे रद्द करुन पुन्हा नव्याने नविन निविदा काढून, नविन ठेकेदारास देण्यात यावे. बोगस काम करणाऱ्या ठेकेदारास काळया यादीमध्ये समाविष्ट करावे.



बोगस कामाकडे डोळेझाक करून अभय देणाऱ्या अभियंत्यावर कायदेशिर कार्यवाही करुन तातडीने निलंबित करण्यात यावे. यासाठी जो काही शासनाच्या निधीचा खर्च झाला तो संबंधित ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावा. असे न झाल्यास येत्या 02 ते 04 दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास त्या अधिकाऱ्या विरुध्द शिवसेना स्टॉईलने उत्तर देण्यात येईल असे सचिन पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख, नांदेड यांनी दिलेल्या निवेदन म्हंटले आहे.



