हिमायतनगर | नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी चिंताजनक बाब समोर आली आहे. हिमायतनगर शहरात अन्नऔषध प्रशासनाच्या आशीर्वादानेच भेसळयुक्त खाद्यतेलाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करडई, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत निकृष्ट व भेसळयुक्त तेल बाजारात बिनधास्तपणे विकले जात आहे.


अन्न सुरक्षा मानके कायदा २०११ नुसार खुल्या खाद्यतेल विक्रीवर बंदी असतानाही शहरातील किराणा दुकाने व होलसेल बाजारात खुले तेल, पॅकेजवर नमूद नसलेले ब्रँड आणि लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. एवढेच नव्हे तर तेलाच्या डब्यावर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी तेल विकून ग्राहकांची सर्रास फसवणूक होत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून घाईगडबडीत तपासणी व पाहणी न तेलाची खरेदी केली जात असल्याने भेसळखोरांचे मनोबल वाढले आहे.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असे भेसळयुक्त तेल दीर्घकाळ सेवन केल्याने हृदयविकार, पचनसंस्थेचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनीही खाद्य तेलाची खरेदी करताना आयएसआय लेबल, वजन व परवाना तपासणे आणि संशयास्पद वस्तूंबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. नुकतेच हिमायतनगर शहरात एका किराणा दुकानातून खरेदी केलेल्या बिस्किटमध्ये अळ्या आढळल्या होत्या. याबाबतची तक्रार झाल्यानंतर अनेक किराणा दुकानदाराने एक्स्पायरी देत व जुना माल फेकून दिल्याची चर्चा झाली, मात्र अन्न औषध प्रशासनाने या बाबीला गांभिर्यानं घेतले नसल्याने आता दिवाळीत भेसळीचे साहित्य विक्रीची चर्चा होऊ लागली आहे.


केंद्र सरकारने खुल्या तेल विक्रीवर बंदी घातली असतानाही हिमायतनगरात अनेक किराणा दुकानातून तीळ, जवस, करडई, शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन अशा विविध तेलांची खुलेआम विक्री सुरू आहे. करडई व शेंगदाणा तेलाचे भाव अधिक असल्याने या तेलात भेसळीचे प्रमाणही सर्वाधिक असल्याचे तळण पदार्थ करणाऱ्या गृहिणींना याचा अनुभाव येत आहे. तर काही ब्रँडेड कंपनीच्या तेलाचे तळण करताना तळण होण्यापूर्वीच तेलावर फेस येऊ लागल्याने भेसळयुक्त साहित्य व तेलाची विक्री होत असल्याची शंका वाढली आहे.


स्थानिक नागरिकांचे मत:
“प्रशासनाने डोळेझाक केल्याने भेसळखोरांना मोकळा वाव मिळाला आहे. अन्न औषध प्रशासनाने हिमायतनगर शहरात तातडीने धाडसत्र राबवून शहरातील किराणा दुकानातून विक्री होणाऱ्या खाद्यतेलासह इतर साहित्याचे नमुने तपासणीला नेऊन दोषी किराणा दुकानदारांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तरच या भेसळ व्यवहाराला आळा बसेल असेही जागरूक नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर आमच्या प्रतीनिधीला सांगितले आहे.
खाद्यतेल खरेदी करताना पॅकेजवरील आयएसआय लेबल, वजन व परवाना क्रमांक तपासावे, खुले तेल किंवा संशयास्पद उत्पादनांची खरेदी टाळावि, भेसळ आढळल्यास संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावि, या सर्व बाबीची खबरदारी घेऊन साहित्य खरेदी करून आरोग्याला होणार धोका टाळणे गरजेचे आहे.


