नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सिरंजनी येथील एका गावगुंडावर हिमायतनगर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे. या घटनेवरून महिलां – मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न आला ऐरणीवर आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे सिरंजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीला शिकणारी आठ वर्षीय मुलगी सोमवारी दिनांक ३ मार्च रोजी शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना धम्मपाल राजू येरेकार या गावगुंडाने तिला रस्त्यात अडवले. त्याने तिच्या अंगावर हात टाकून तिची पॅन्ट काढली आणि तिच्या पार्श्वभागावर हात फिरवत अश्लील चाळे करू लागला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित शाळकरी मुलीने आरडाओरड सुरू केली.

पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून याच शाळेत इयत्ता सातवीला शिकणारी तिची १२ वर्षीय मोठी बहीण धावत आली. धम्मपाल राजू येरेकारच्या तावडीतून लहान बहिणीची सुटका करण्याचा तिने प्रयत्न केला असता त्याने तिलाही दमदाटी करून धमकावले. या दोघींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावातील काही लोक धावत येत असल्याचे पाहून धम्मपाल येरेकारने तिथून पळ काढला.

घाबरलेल्या अवस्थेत या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींनी घरी पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यांच्या आईने मंगळवारी हिमायतनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. आईच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांनी धम्मपाल राजू येरेकारच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या (पोक्सो) कलम १० व १२ अन्वये गुन्हा दाखल करून बुधवारी त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल भगत करत आहेत. एकूणच महिला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे सध्या राज्याचे वातावरण तापलेले असतानाच बाल लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झाल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

धम्मपाल राजू येरेकार हा सराईत गुंड असून २४ फेब्रुवारी रोजी सिरंजनी येथीलच एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ११५ (२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी धम्मपाल राजू येरेकारला फक्त समज देऊन सोडून दिले होते. त्यानंतर आता त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धम्मपालच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सिरंजनी गावातील महिला-मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून अनेक महिलांनी कामासाठी शेतावर जाणेही बंद केले आहे.