नांदेड l येथून जवळच असलेल्या कामठा खु. (गाडेगाव) ता. जि. नांदेड येथील महामार्गावरील नियोजित गुरु रविदास मंदिराच्या जागेवर ध्वजारोहण करुन क्रांतीकारी महामानव गुरु रविदासांची ६२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि ज्येष्ठ सामाजिक नेते व्यंकटराव दुधंबे यांच्या हस्ते सर्वप्रथम गुरु रविदासांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व पिवळ्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. यावेळेस गोविंद माऊली पार्डीकर आणि केरबा कसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.


नियोजित जागेवर फक्त ध्वजारोहण व अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता पण पाहुण्यांनी भाषणबाजी नाही तर विचार विनिमय करण्यासाठी सर्वांना मंडपात एकत्र बसण्याचे आवाहन केले. त्यानुसार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी सर्वप्रथम आपण आज येथे भाषणबाजी करणार नसून समाजाशी फक्त हितगुज करणार असल्याचे जाहिर केले.


महामार्गावर असलेली गुरु रविदास मंदिराची ही नियोजित जागा एकदम मोक्यावर असून सर्वप्रथम येथे संरक्षण भिंत किंवा तारेचे कुंपन लाऊन घेणे गरजेचे आहे. याबाबत विलंब का होत आहे ? काय अडचण आहे याची सविस्तर चर्चा करुन इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी स्वतःच्या खिशात हात घालून अगोदर एक हजार रुपये हातात धरले व बाकीच्यांनी घडेल तेवढी रक्कम देण्याचे आवाहन केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला व एका दमात चाळीस हजार रुपये जमा झाले.

जमा झालेल्या या चाळीस हजारामुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढला. आणखी कांही रक्कम जमा करुन कुंपनाबरोबरच लगेच पाण्यासाठी बोअर मारण्याचा देखिल एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.
त्यानुसार व्यंकटराव दुधंबे यांनी लगेच बोअर मशीन एजंटला फोन करुन लागलीच मशीन मागवून खोदकाम सुरु करण्यात आले व कांही क्षणार्धात भरपूर पाणी लागले. काटेरी कुंपनही लगेच दुसऱ्या दिवशी लावण्यात आले. त्यामुळे ही जयंती म्हणजे भाषणाऐवजी कृती कार्यक्रम असल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. याप्रसंगी व्यंकटराव दुधंबे, गोविंद माऊली व केरबा कसारे यांनीही प्रसंगानुरूप मार्गदर्शन केले.
किशनराव गोरे, श्रीराम गोरे, प्रकाश गोरे, डॉ. कैलास भाडेकर, आनंदा भाडेकर, रामजी भाडेकर, धनंजय गोरे, राहुल गोरे, नागेश गोरे, विनोद गोरे, संतोष भाडेकर, शांताबाई गोरे, मायावतीबाई गोरे, प्रिया गोरे, गंगुबाई भाडेकर आदींची यावेळेस प्रमुख उपस्थिती होती. अन्नदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


