नांदेड| महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यातील पुरुष खेळाडू कर्मचारी दरवर्षी जिंकण्यामध्ये अग्रेसर राहतात. यावर्षी महिला खेळाडू कर्मचारी या पुरुष खेळाडू कर्मचाऱ्यांप्रमाणे अव्वल क्रमांक पटकावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.
नांदेड जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2022-23 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार 15 डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडियम नांदेड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे हस्ते झाले. यावेळी सी.आर.पी.एफ. कैंप मुदखेडचे डी. आय. जी ब्रिगे. जी. एस. रेड्डी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा डालकरी, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, लक्ष्मण नरमवार, गिरीष येवते, नन्हू कानगुले, मधुकर वाठोरे, चंद्रमुनी सावंत, सुधाकर डोईवाड, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, तलाठी, शिपाई व कोतवाल यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम श्री पठाण मंडळ अधिकारी व त्यांचा चमू यांनी पोलिस गृह शाखेच्या पथकासह संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविकात मागील अनेक वर्षापासून नांदेड जिल्हा औरंगाबाद विभागात सर्वसाधारण विजेता राहिलेला असून यावर्षीही निश्चीतपणे सर्वसाधारण विजेता राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी सर्व खेळाडू व अधिकारी/कर्मचारी यांना नियोजनबध्द परिश्रम घेण्याच्या सूचना दिल्या.
डी. आय. जी ब्रिगे. प्रा. जी.एस. रेड्डी यांनी व्यक्तीच्या आयुष्यात क्रीडा व कलागुणाचे महत्त्व अधोरेखीत करुन खेळाडूंना स्पर्धा जिंकण्यासाठी उत्साहासोबतच संयम आवश्यक आहे असल्याचे सांगितले. तहसीलदार किरण अंबेकर, मंडळ अधिकारी नन्हू कानगुले, महसूल सहायक लक्ष्मण नरमवार, कोतवाल सुधाकर डोईवाड यांनी मनोगत व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेची सुरुवात क्रिकेटच्या सामन्याने झाली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी काकडे, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माधव डांगे, बाळू संबेटवाड यांनी परिश्रम घेतले. तहसिलदार विजय अवधाने, यांनी आभार व्यक्त केले.