हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरातील पाणी टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली असून, शहरातील वॉर्ड क्रमांक ४ मधील गणेशवाडी, रॉयलनगर, मुजिब नगरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाण्याच स्रोत उपलब्ध करून घ्यावे यासाठी बालाजी लक्ष्मण ढोणे यांनी नगर पंचायत समोर दिनांक १९ मे पासून आमरण उपोषण सुरू केले असून, बुधवारी तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरू असल्याने शेकडो महिलांनी उपस्थित होऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता.

शासनाने शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून १९ कोटी 19 लक्ष रुपयांच्यावर योजना मंजूर केली, मात्र सदरील योजना अर्धवट आणि निकृष्ट पद्धतीनं राबविण्यात आल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आहे, अर्धवट नालयोजना जैसे- थे अवस्थेत असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ शहरातील जनतेवर आली आहे.

हिमायतनगर शहरातील वॉर्ड नंबर 4 प्रभागातील बहुतांश रहिवासी सामान्य मजूरदार असुन, काबाडकष्ट करून कुटुंबाचा प्रपंच चालवतात, दिवसभर कामाला जाऊन पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाण्याच स्रोत उपलब्ध करून घ्यावे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातपुर्ती का होईना गणेशवाडी येथील अस्तित्वात असलेल्या ५०० फुटांचा बोअर रिबोर करावा, दुसरा २०० फुटांचा मंजूर बोअर (विंधन विहिरी) ५०० फुट करावी.



आणि रखडलेल्या पाणी पुरवठा नळ योजनेचे काम पूर्ण करून सर्वांना नळ कनेक्शन देऊन दिलासा द्यावा या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी देखील आमरण उपोषण सुरू असून, बुधवारी या उपोषणाला पाणी देता का पाणी म्हणत शेकडो महिलांनी पाठिंबा देत नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून ठिय्या मांडल्या होत्या. जोपर्यंत दोन्ही मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा बालाजी ढोणे यांच्यासह महिला आंदोलकांनी घेतला आहे. या उपोषणाला विविध पक्ष, संघटना व नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.


